रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची ७ ऑक्टोबरला मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक
सावंतवाडी प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने कोकण विभागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्यप्रकार घडल्यानंतर आणि प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदाची वरिष्ठ स्तरावर झालेली निवड या सर्व पार्श्वभूमीवर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एकत्रित महत्त्वपूर्ण बैठक येत्या ७ऑक्टोबरला मुंबई प्रदेश कार्यालयात बोलवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत कोकण विभागातील आगामी होणाऱ्या लोकसभा ,विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. तसेच पक्ष वाढीच्या दृष्टीनेही चर्चा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक एक तास बैठकीसाठी देण्यात आला आहे. प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलवण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष यांची उचल बांगडी करून त्या जागी प्रदेश स्तरावरून नव्याने प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर अवघ्या 24 तासाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी , पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे प्रदेश कडे पाठवले होते . मुंबई ते दिल्ली स्तरापर्यंत या प्रभारी जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीला आक्षेप घेत काँग्रेसच्या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या जाणत्या व नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची भाषाही केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश कडून प्रभारी जिल्हा अध्यक्ष पद स्थगित करून पुन्हा पूर्वीच्या जिल्हा अध्यक्षांकडे कार्यभार सोपवला आहे. या एकंदरीत काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्य घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये प्रदेश स्तरावर हलचल माजली. आणि त्यानंतर आता कोकण विभागातील चारही जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक ७ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजीनामा नाट्य प्रकरण आणि प्रभारी जिल्हा अध्यक्ष निवड प्रदेश स्तरावरून झाली याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी ,कार्यकर्ते या राजीनामा नाट्य आणि एकंदरीत निवड प्रक्रियेवर प्रदेश स्तरावर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरील बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.