सुमारे चार तास वाहतूक कोंडी
वार्ताहर /तवंदी
हायड्रोजन सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तवंदी घाटात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. तेरासिंग दाल्बीसिंग (वय 43, रा. पंजाब) असे ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ट्रक (जीजे 16 एव्ही 9196) हा हायड्रोजन सिलिंडर टाक्या भरून तो कणगलानजीक असणाऱ्या ग्लास फॅक्टरीमध्ये गेला होता. तेथे टाक्या खाली करून गुरुवारी पहाटे ट्रक तवंदी घाट उतरत होता. दरम्यान तवंदी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर ट्रक चालक तेरासिंग याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला. यात चालक तेरासिंग हा जागीच ठार झाला. अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे जवळपास दोन लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तर ट्रकमध्ये असलेल्या हायड्रोजन सिलिंडरच्या रिकाम्या टाक्या महामार्गावर विखुरल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे उच्च अधिकारी विजय दाईंगडे तसेच अवताडे कंपनीचे सुपरवायझर अक्षय सारापुरे, संतराम माळगी, सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी तसेच पोलीस कर्मचारी व निपाणी अग्निशमन दल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. अपघातानंतर तेरासिंग याचा मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. तेरासिंग यांचे नातेवाईक उशिरा येणार असल्याने मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे पाठवण्यात आला असल्याची माहिती निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी दिली. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.
सुमारे चार तास वाहतूक कोंडी
अपघातानंतर महामार्गाच्या वरील व खालील बाजूस मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची अथवा सिलिंडर स्फोट होऊ नये यासाठी निपाणी अग्निशमन दलाचे सर्व जवान उपस्थित होते. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यात आला व यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली.