गोवा-बेळगाव महामार्गावर दुर्गिणी धारबांदोडा येथील दुर्घटना : गोवा पर्यटन करून तेलंगणच्या परतीच्या वाटेवर अपघात
फोंडा : गोवा-बेळगाव महामार्गावरील दुर्गिणी-धारबांदोडा येथे आमिगोस हॉटेलजवळ पर्यटकांसह पणजी-हैद्राबाद वोल्वो बस रस्त्याच्या कडेला उजव्या बाजूने कलंडल्याने बसचालक जागीच ठार झाला तर 26 प्रवासी जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जीव वाचविण्यात पोलीस, अग्निशामक दल यशस्वी ठरले मात्र बसचा पत्रा कापून बाहेर काढेपर्यत चालकाचा मृत्यू झाला होता. अपघाताची घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास घडली. शिवराम रे•ाr अशी मृत चालकाची ओळख पटली आहे. फोंडा पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार गौतमी ट्रान्सपोर्टची टीएस 12 युडी 9707 प्रवासी बस 45 प्रवाशांसह पणजीहून हैद्राबाद येथे जाण्यासाठी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निघाली होती. वोल्वो बस आपल्या तीन चालक-सहचालक दिवसरात्र प्रवास करीत 16 तासात नियोजितस्थळी हैद्राबाद येथे पोहोचणार होती. मात्र दुर्गिणी-धारबांदोडा येथील आमिगोस हॉटेलजवळील वनवे मार्ग पार केल्यानंतर वळणावर चालकाचा बसवरील ताबा गेल्याने साकवाच्या संरक्षक कठड्यावरून घसरत सरळ ओहोळाच्या बाजूने स्थिरावली. यावेळी धारबांदोडाहून मोलेमार्गे जाणारी ही बस सरळ उलट्या दिशेन तोंड करीत स्थिरावली. सुदैवाने पाण्यात न पडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अपघातानंतर जीव वाचविण्याच्या गडबडीत काही प्रवासी ओहोळाच्या पाण्यातून बाहेर रस्त्यावर आले तर काहींनी खिडकीतून वाट काढीत सुटका करून घेतली. वाहनचालक व अन्य एक महिला बसमध्ये अडकून पडली.
पर्यटनानंतर गोव्यातून परतताना अपघात
सहलीसाठी आलेले पर्यटक परतीच्या वाटेवरून जात असताना हा अपघात घडला. बसमध्ये चालकासह अन्य एका महिलेला काढण्यासाठी कुळे पोलीस स्थनाकाचे पथक व फोंडा अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने ती बचावली. मात्र बसचा पत्रा कापून बाहेर काढेपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एकूण 26 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांची अधिक उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने 108 ऊग्णवाहिका व पोलिसांच्या वाहनांसह तिस्क उसगांव येथील सरकारी इस्पितळात व गंभीर जखमांना गोमेकॉत हलविण्यात आले आहे.
या धोकादायक वळणावर सरकारचे दुर्लक्ष
गोवा-बेळगांव राष्ट्रीय महामार्गावरील दुर्गिणी धारबांदोडा येथील या धोकादायक वळणावर यापूर्वीही अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. कर्नाटकमार्गे जाणारी अवजड वाहनांसह प्रवासी बसेस कायम या मार्गाने ये-जा करीत असतात. तरीही सरकारी यंत्रणेला अजून जाग आलेली नाही. यापूर्वी आमिगेस हॉटेलच्या इमारतीत आरटीओ कार्यालयही कार्यरत होते.