पावसाचे पाणी खड्डय़ात साचल्यामुळे समस्या : त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील मार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. मंगळवारी झालेल्या पावसाने या खड्डय़ांमध्ये पाणी भरल्याने खड्डय़ाचा अंदाज येत नव्हता. यामुळे अनेक वाहनचालक येथे अडकून पडत होते. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया पोस्टमन सर्कल येथे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
पोस्टमन सर्कल ते रेल्वेस्थानक रोडवर मागील अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. मागीलवषी या रस्त्यावर अनेक अपघात घडले होते. अखेर 15 दिवसांपूर्वी पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते रेल्वेस्थानकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु पोस्टमन सर्कल परिसरात रस्ता करण्यात आला नसल्याने या ठिकाणचे खड्डे जैसे थे आहेत.
पोस्टमन सर्कल परिसरात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे या मार्गावरून जाताना खडय़ातील पाण्याचे फवारे नागरिकांवर उडत आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत.
मध्यंतरी या खड्डय़ांमध्ये पेव्हर्स बसविण्यात आले होते. परंतु काही ठिकाणचे पेव्हर्स उखडून गेल्यामुळे या भागाचे डांबरीकरण करणे आवश्यक बनले आहे.