जत, प्रतिनिधी
Sangli News : काँग्रेसने दुष्काळ प्रश्नी जत याठिकाणी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे .आ. विक्रम सावंत बाजार समिती सभापती सुजय नाना शिंदे शेकडो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.तर ठिकठिकाणी टायर पेटवून सरकारचा निषेध केला.शनिवारी साडे दहा वाजल्यापासून हे आंदोलन सुरु आहे.जिल्हा अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.या मार्गांवरील पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला.
यावर्षी अवकाळी अगर कोणत्याही प्रकारे पाउस न झाल्याने जत तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांचा प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकरिता शासनाने त्वरित जत तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करावं लागणार आहे.जत तालुका कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने चालू वर्षी गंभीरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं तातडीने जत तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी काँग्रेसने शनिवारी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान,आंदोलन कर्त्यांनी चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.खरीप पिक वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्व सवलती देण्यात द्याव्यात तसेच सध्या जत तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना,चांदोली धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन जत तालुक्याकरिता सुरु करून जत तालुक्यातील पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसेच या आवर्तनाचे बिल टंचाई निधीतून भरणेत यावे.शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याकरिता शासनाकडून थेट अनुदान मिळावे.सध्या गाई, म्हशींच्या दुधाचे दर खूप कमी झाले आहेत. या दुधदरात स्थिरता येणेसाठी शासनाने उपाययोजना कराव्यात.खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान मिळावे.पाणी टंचाई असणाऱ्या गावांना टँकरद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करणेत यावा,आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी आ. विक्रम सावंत, सुजय नाना शिंदे, आप्पाराय बिराजदार, बसवराज बिराजदार, सरदार पाटील, नाथा पाटील, माणिक वाघमोडे, सलीम पाचापुरे, अशोक बननेवार, संतोष भोसले, युवराज निकम, निलेश बामणे, तुकाराम माळी, दत्ता निकम, महादेव पाटील, बाबासाहेब माळी, भूपेंद्र कांबळे, बाळासाहेब तंगडी, रवी पाटील, परशुराम मोरे, सई नदाफ, गणी मुल्ला, आण्णासाहेब गायकवाड, रमेश साबळे, अतुल मोरे आदी उपस्थित होते.