सहा पाकिस्तानींना अटक ः केरळमध्येही मोठी कारवाई
गांधीनगर
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने शनिवारी सकाळी संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ पाकिस्तानी बोट पकडली. अल सक्कार नावाच्या या बोटीतून 50 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. बोटीवरील सहा पाकिस्तानी तस्करांना अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत अंदाजे 350 कोटी रुपये आहे. पुढील तपासासाठी बोट कच्छ जिल्हय़ातील जाखाऊ बंदरात नेण्यात आली आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून 200 कोटी रुपयांचे 40 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. केरळमध्येही कोची किनारपट्टीवर नौदलाने अशीच मोठी कारवाई केली असून 200 किलो अमलीपदार्थ जप्त करत पाकिस्तान आणि इराणमधील तस्करांना अटक केली आहे.