टेरर फंडिंग प्रकरणात दहशतवाद्यांना अटकेपासून संरक्षण, 5 लाखांची लाचही घेतल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरूवारी निलंबित डीएसपी आदिल मुश्ताक शेख याला अटक केली. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपी मुझामिल जहूरकडून 5 लाख रूपयांची लाच घेतल्याचा आणि अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला गोवल्याचा आरोप आदिल शेखवर ठेवण्यात आला आहे.
डीएसपी आदिल मुझामिल शेख हा जहूरच्या सतत संपर्कात होता. टेरर फंडिंग प्रकरणात त्याला वाचवण्याचा तो सतत प्रयत्न करत होता. पोलिसांना टेलिग्राम अॅपवरील चॅट आणि आदिल आणि मुझामिल यांच्यातील सुमारे 40 फोन संभाषणांचे रेकॉर्ड देखील सापडले आहेत. शेख आदिलविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खोटे पुरावे देणे आणि पुरावे नष्ट करणे यांचाही समावेश आहे.
या वषी फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी दहशतवादी फंडिंग प्रकरणात लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 31 लाख रूपये जप्त करण्यात आले. तिघांनीही चौकशीदरम्यान मुझामिल जहूरचे नाव उघड केले होते. तपासादरम्यान डीएसपी आदिल आणि मुझामिल जहूर यांच्यातील संपर्क उघड झाला. डीएसपी आदिल याला मार्चमध्ये निलंबित करण्यात आले होते. पोलीस मुझामिलचा शोध घेत होते. दरम्यान, जुलैमध्ये त्याने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी मुझामिलला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान, मुझामिलने ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूद्ध एफआयआर दाखल केलेल्या पोलीस अधिकाऱ्याविरूद्धची तक्रारही डीएसपी आदिल शेख यानेच तयार केल्याचे उघड झाले. एवढेच नाही तर शेख आदिल मुझामिलला अटकेपासून वाचवण्यासाठी कायदेशीर सल्लाही देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा दिवसांची पोलीस कोठडी
शेख आदिल हा काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील असून तो जम्मू-काश्मीर पोलिसांचा 2015 बॅचचा अधिकारी आहे. डीएसपी आदिल याच्यावर यापूर्वीही खंडणी व महिलांना ब्लॅकमेल करण्याचे आरोप होते. गुरूवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीचे पाच सदस्यीय पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.
तीन वर्षांतील दुसरी घटना
गेल्या तीन वर्षांत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलिसांशी संबंधित हे दुसरे प्रकरण आहे. 2020 मध्ये, काश्मीरचे डीएसपी दविंदर सिंग याला हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना आश्र्रय दिल्याबद्दल आणि त्यांना दिल्लीत नेल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दविंदर सिंग सध्या तुरूगात असून त्याच्यावरही दहशतवाद्यांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.