वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला प्रत्येक वर्षी दुलिप करंडक स्पर्धेने प्रारंभ केला जातो. आता 2023-24 च्या क्रिकेट हंगामात दुलिप करंडक स्पर्धा बेंगळूरमध्ये 28 जूनपासून खेळवली जाणार असून सदर स्पर्धा बाद फेरीची राहिल. विविध विभागातील 6 संघांचा यामध्ये समावेश आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासातील दुलिप करंडक स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. आता 2023 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेला दोन उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना अलूर येथे मध्य आणि पूर्व विभाग यांच्यात तर दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उत्तर विभाग आणि पूर्व विभाग यांच्यात बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. 5 जुलैपासून उपांत्य सामन्यांना प्रारंभ होईल. विद्यमान विजेता पश्चिम विभाग आणि अलूरमधील पहिल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यातील विजयी संघ यांच्यात तर दुसरा उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यातील विजयी संघात होणार आहे. हे दोन्ही सामने बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जातील. 12 ते 16 जुलै दरम्यान स्पर्धेतील अंतिम सामना बेंगळूरमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघाची निवड 15 जूनला केली जाईल. दरम्यान भारतीय संघाचा विंडीज दौरा याच कालावधीत होत आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 12 जुलैपासून प्रारंभ होत आहे.