अंगणवाडी सेविका मोबाईलसाठी आक्रमक : महिला-बालकल्याण खात्याला निवेदन
बेळगाव : अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत. त्यामध्ये ई-समीक्षा सर्व्हेचे काम करणे अशक्य आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल तातडीने द्यावेत. जोपर्यंत नवीन मोबाईल दिले जात नाहीत, तोपर्यंत ई-समीक्षा सर्व्हे केला जाणार नाही, असा इशारा कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघ (सीआयटीयू) बेळगाव तालुका यांच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन महिला व बालकल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर. यांना दिले आहे. अंगणवाडी सेविकांवर ई-समीक्षा सर्व्हेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. मात्र अंगणवाडी सेविकांकडे असलेले मोबाईल बंदस्थितीत आहेत. त्यामुळे काम करणे अशक्य झाले आहे. चार वर्षांपूर्वी अंगणवाडीचा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालावा यासाठी खात्याने अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल दिले होते. मात्र हे मोबाईल कमी स्टोरेजचे असल्याने हँग होणे आणि इतर समस्या वाढल्या आहेत. तर काही ठिकाणी रेंजअभावी मोबाईल वापरणे अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजात अडचणी येऊ लागल्या आहेत. अंगणवाडीचा कारभार सुरळीत करण्यासाठी नवीन मोबाईलची गरज आहे, अशी मागणी सेविकांनी केली आहे. याबाबत सहसंचालक नागराज आर. यांनी नवीन मोबाईलबाबत अंगणवाडीचा प्रस्ताव पुढे पाठवून सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव ग्रामीणमध्ये 674 हून अधिक अंगणवाडी केंद्रे
बेळगाव ग्रामीणमध्ये 674 हून अधिक अंगणवाडी केंद्रे आहेत. त्या सर्व केंद्रांमध्ये सेविकांना मोबाईल फोन पुरविण्यात आले आहेत. मात्र ते फोन आता कुचकामी ठरले आहेत. काही ठिकाणी रेंजची समस्या तर काही ठिकाणी फोन हँग होऊ लागले आहेत. त्यामुळे सेविकांना ऑफलाईन कारभार चालवावा लागत आहे. येत्या काळात नवीन मोबाईल न दिल्यास स्वत:कडे असलेले जुने मोबाईल परत केले जातील, असा आक्रमक पवित्रादेखील अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.