ढिगाऱयाखाली शेकडो लोक पुन्हा अडकले ः कमकुवत इमारतींचे अधिक नुकसान
वृत्तसंस्था / अंकारा
तुर्किये आणि सीरियामध्ये 14 दिवसांनी म्हणजेच सोमवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.4 इतकी राहिली. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून 294 जण जखमी झाले आहेत.
भूकंपाचे केंद्र हताय प्रांतातील अंताक्या शहरात होते. भूकंपाचे केंद्र 2 किलोमीटर खोलवर होते. भूकंपोत्तर धक्क्यांची तीव्रता 3.4 ते 5.8 इतकी राहिली आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे कमकुवत झालेल्या इमारती या धक्क्यांमुळे कोसळल्या आहेत. ढिगाऱयांखाली अनेक जण अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
तुर्किये-सीरिया सीमावर्ती भागात 68 तासांमध्ये भूकंपाचे 11 धक्के जाणवले आहेत. भूकंपानंतर 3 ठिकाणी शोध आणि बचावमोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या भूकंपाचे धक्के लेबनॉन, इस्रायल आणि सायप्रसमध्ये देखील जाणवले आहेत. युरोपियन मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरनुसार अजून काही काळ भूकंपोत्तर धक्के जाणवणार आहेत.
अंताक्या प्रांतातील हताय शहरात अनेक जण ढिगाऱयांखाली अडकून पडले आहेत. तर सीरियाच्या भागात 150 लोक जखमी झाले आहेत. भूकंप पीडित लोकांसमोर निवाऱयाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. हाडं गोठविणाऱया थंडीत लोकांना लहान मुलांसोबत मोकळय़ा आकाशाखाली रहावे लागत आहे.
6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे तुर्किये आणि सीरियात मृत्युमुखी पडणाऱया लोकांची संख्या 47 हजारांहून अधिक झाली आहे. तुर्कियेत 41 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. सीरियात 5,800 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन्ही देशांमधील 2 कोटी 60 लाख लोकांना मदतीची गरज आहे.