मृतांची संख्या 2,122 वर : जवळपास अडीच हजार जखमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहा दशकांहून अधिक काळातील सर्वात विनाशकारी भूकंपामुळे मोरोक्को पूर्णपणे हादरला आहे. मृतांचा आकडा 2,100 च्या पुढे गेला असून त्यात आणखी वाढ होत आहे. भूकंपातून वाचलेले लोक अन्न, पाणी आणि निवाऱ्याच्या प्रतिक्षेत असून दुर्गम भागात बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, आता इस्रायलचे एक मदतपथक मोरोक्कोमध्ये दाखल झाले असून त्यांनी मदत व बचावकार्यात सहभाग घेतला आहे. मोरोक्कोला वस्तू आणि आर्थिक स्वरुपात मदत देण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. मोरोक्कोच्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी निधी तयार केला जात आहे. पिण्याचे पाणी, अन्नपदार्थ, तंबू आणि ब्लँकेटचे वाटपही ठिकठिकाणी केले जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) या आपत्तीमुळे 300,000 हून अधिक लोक प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.
मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड हानी झाली आहे. अनेक घरे-इमारतींची पडझड झाल्यामुळे जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. रॉयटर्सने एका सरकारी टीव्हीच्या हवाल्याने मृतांची संख्या 2,122 झाली असून 2,421 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात अनेक घरे कोसळली असून सदर गावात पोहोचण्यासाठी मदत व बचाव कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मोरोक्कोच्या सांस्कृतिक वारसास्थळांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या मॅराकेश ओल्ड सिटीच्या काही भागांनाही नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.