केरळमधील चार जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम
वृत्तसंस्था/ तिऊअनंतपुरम
ईडीने पुन्हा एकदा पीएफआयवर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. तपास यंत्रणेने केरळमधील माजी पीएफआय कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. ईडीने सोमवारी सकाळपासून थ्रिसूर, एर्नाकुलम, मलप्पुरम आणि वायनाडसह चार जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या भागात कारवाई सुरू होती. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने 10 राज्यांमध्ये छापे टाकून 100 हून अधिक पीएफआय नेत्यांना अटक केली होती.
ऑगस्टमध्ये एनआयएने मलप्पुरममधील अनेक पीएफआय कार्यकर्त्यांच्या घरांवरही छापे टाकले होते. वेंगारा येथील थायल हमजा, तिरूरमधील कलाथीपरंबिल याहुथी, तनूरमधील हनिफा आणि रंगत्तूर पडिक्कपरंबिल जाफर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या सर्व भागांमध्ये बंदी घातलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांचे वास्तव्य आहे. ऑगस्टच्या सुऊवातीला एनआयएने पीएफआयच्या सर्वात मोठ्या आणि जुन्या शस्त्र प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मंजेरी येथील ग्रीन व्हॅली अकादमीला सील ठोकल्यानंतर वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविण्यात आली. पीएफआयचे हे सहावे शस्त्र प्रशिक्षण केंद्र होते. मंजेरी केंद्राचा वापर पीएफआय आणि त्यांच्या प्रमुख संघटना शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली करत आहेत.
या महिन्याच्या सुऊवातीला पीएफआय प्रकरणात एनआयएने केरळव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले होते. तपास यंत्रणांनी तेलंगणातील 38 ठिकाणी आणि आंध्रप्रदेशातील दोन ठिकाणी शोध घेतला होता.