शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 13 जून रोजी पाचारण
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील प्राथमिक शाळेतील शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुऊवारी समन्स बजावले. नोटीस बजावण्यासाठी ईडीचे अधिकारी कोलकाता येथील हरीश मुखर्जी रोडवरील त्यांच्या ‘शांतीनिकेतन’ या निवासस्थानी गेले होते. त्यांना 13 जून रोजी चौकशी पथकासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. एकीकडे अभिषेक बॅनर्जी यांच्यामागे चौकशीचे फेरे सुरू असतानाच त्यांची पत्नी ऊचिरा हिची ईडीने कोळसा खाण घोटाळाप्रकरणी सुमारे चार तास चौकशी केली.
प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि बोगसगिरी झाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप होत असल्यामुळे त्यांची यापूर्वीही तपास यंत्रणांकडून चौकशी झाली आहे. यापूर्वी तृणमूल खासदार बॅनर्जी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने 20 मे रोजी कोलकाता येथे प्राथमिक शाळेतील नोकरी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. आता 13 जून रोजी सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील कथित बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे ईडीच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.