मनी लाँड्रिंगप्रकरणी 31 मे रोजी चौकशीसाठी पाचारण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल कॉन्फरन्सचे ज्ये÷ नेते फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत लवकरच वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अब्दुल्ला यांना शुक्रवारी समन्स बजावले. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी 31 मे रोजी दिल्ली मुख्यालयात तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
फारुख अब्दुल्ला यांची ही चौकशी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाशी संबंधित आहे. याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यानुसार सखोल तपासासाठी फारुख अब्दुल्ला यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत 31 मे रोजी येथील मुख्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 2020 मध्ये या प्रकरणात अब्दुल्ला यांची 11.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. याप्रकरणी यापूर्वीही ईडीने त्यांची अनेकदा चौकशी केली आहे. अब्दुल्ला यांनी जेकेसीएचे अध्यक्ष असताना आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि बीसीसीआय प्रायोजित निधीचा गैरवापर करता यावा म्हणून क्रीडा संस्थेत नियुक्त्या केल्याचा आरोप ईडीने केला होता.