शिवीगाळ केल्याच्या पोस्टवरून विद्यार्थ्याचा खून, पोरसवदा मुलांकडून तलवारीचा वापर
बेळगाव : सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात शिवीगाळ करणारी पोस्टमुळे सुरू झालेल्या वादावादीचे पर्यवसान एका विद्यार्थ्याच्या खुनात झाले आहे. कित्तूर तालुक्यातील यत्तीनकेरी येथे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. प्रज्ज्वल मल्लेश सुंकद (वय 16) रा. यत्तीनकेरी असे खून झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. यत्तीनकेरीच्या जवळच असलेल्या मल्लापूरमधून आलेल्या पाच जणांनी प्रज्ज्वलवर मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तलवार हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने बेळगाव येथील खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचारांचा उपयोग न होता बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला खुनी हल्ला प्रकरणाची नोंद झाली होती. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर खून प्रकरण दाखल करण्यात आले असून घटनेनंतर काही तासातच पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मल्लापूर येथील विशाल कल्लव•र (वय 19) व अन्य चार अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. विशालला न्यायालयासमोर तर अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील शिवीगाळ करणाऱ्या पोस्टमुळे विद्यार्थ्याचा खून झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
पालकांचे दुर्लक्ष, वृत्ती अन् प्रवृत्ती
कित्तूर तालुक्यातील विद्यार्थ्याच्या खुनाच्या घटनेनंतर अल्पवयीनांच्या हाती स्मार्टफोन सोपविणाऱ्या पालकांना जणू धोक्याचा इशाराच मिळाला आहे. आपली मुले सोशल मीडियावर सक्रिय असताना नेमका कसा वापर करतात? काही गैरकृत्ये तर करत नाहीत ना? त्यांचा कोणाशी वाद तर सुरू नाही ना? यावर लक्ष ठेवण्याची येऊन ठेपली आहे. पालकांच्या दुर्लक्ष तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना पाहून घेण्याची वृत्ती अशा प्रवृत्तींमुळे या घटना घडत असल्याचे पोलीस दलाचे म्हणणे आहे.