चेअरमन प्रभाकर कोरे यांचे स्पष्टीकरण : पाटणे फाटा येथे वेलनेस हॉस्पिटलचे उद्घाटन
वार्ताहर /कार्वे
केएलई सोसायटीने पाटणे फाटा येथे पैशासाठी हॉस्पिटल चालू केले नसून रुग्णांची आणि चंदगड तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी केले आहे. शिक्षण व सेवा देणे हे केएलईचे ब्रीद वाक्य आहे. केएलईकडे पैशाची कमतरता नाही. मृत्यूनंतर संपूर्ण प्रॉपर्टी केएलईच्या नावे करून देणारे दानशूर दरवर्षी 5-6 जण भेटतात. आजपर्यंत कोट्यावधी लोकांना केएलईमार्फत मोफत सेवा देण्यात आली आहे. चंदगड तालुक्यातील जनतेनेही या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएलई सोसायटीचे चेअरमन माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.
पाटणे फाटा येथे केएलई संचालित वेलनेस हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पाटणे फाट्यावर सुसज्ज वेलनेस हॉस्पिटलचे डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. नितीन गंगाणे, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. परशराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. कोरे पुढे म्हणाले, चंदगडच्या थंड हवेने बेळगाव थंड होते. चंदगड आणि बेळगाव वेगवेगळ्या राज्यात असले तरी हितसंबंध जवळचे आहेत. काही वर्षांपूर्वी येथे कॉलेज सुरू करण्याचा केएलईचा प्रयत्न होता. केएलईने कृषी विज्ञान केंद्र बेळगाव जिह्यात सुरू केले आहे. दोन कृषी विज्ञान केंद्रे एकाच जिह्यात असलेला बेळगाव जिल्हा आहे. ही केंद्रे शरद पवार यांनी मंजूर केली आहेत. 1915 साली लावलेल्या केएलईच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. 306 कॉलेज, हॉस्पिटल आज केएलईच्या मालकीची आहेत. 13000 सभासद असलेली ही संस्था आहे. पक्ष, जात-पात काहीही न पाहता केएलईचे काम सुरू आहे. खेड्यातला मुलगा डॉक्टर होतो व शहरात जातो. तो खेड्यात काम करण्यासाठी तयार होत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले, 24 तास अॅम्बुलन्स सेवा, इमर्जन्सी सेवा या ठिकाणी उपलब्ध केली आहे. एक-दोन वर्षात सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल व कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचा केएलईचा प्रयत्न राहणार आहे. डॉ. परशराम पाटील म्हणाले, तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न प्रलंबित होता. चंदगडच्यादृष्टीने ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यात कुणाचेही श्रेय नाही. डॉ. नितीन गंगाणे यांनी, मनाला प्रसन्नता वाटेल असे हॉस्पिटल या ठिकाणी तयार झाले आहे. भविष्यात 100 टक्के उपचार येथेच होतील यासाठी प्रयत्न आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना महाराष्ट्र सोडून राज्याबाहेर फक्त केएलईमध्ये उपलब्ध आहे, असे सांगितले. यावेळी पी. डी. पाटील, दयानंद गावडे, बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. एम. दयानंद, महांतेश कवटगीमठ, गोपाळराव पाटील, शांताराम पाटील, शिवाजी सावंत, जे. बी. पाटील, नितीन पाटील, तुकाराम बेनके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम पाटील व मनीषा सरनाईक यांनी केले. आभार डॉ. निरंजना महांतशेट्टी यांनी मानले.