खासदार श्रीकांत शिंदे : राजेश चषक फुटबॉल स्पर्धेला दिली भेट : फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षकांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरातील फुटबॉल खेळाडूंना अत्याधुनिक तंत्र अवगत व्हावे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण त्यांना मिळावे यासाठी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल ॲकडमी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना खासदार शिंदे यांनी रविवारी छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरु असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेस भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते फुटबॉल खेळडू, प्रशिक्षक, पंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
खासदार शिंदे म्हणाले, कोल्हापूरमध्ये फुटबॉलचा मोठा चाहता वर्ग असल्याचे मैदानातील गर्दीमधून दिसून येते. येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल आहेत. येथे गुणवत्तापूर्ण खेळाडू आहेत, मात्र त्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी कोलकत्ता, पश्चिम बंगालला जावे लागत आहे. येथील खेळाडूंना कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळाले तर अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचतील असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, उदय भोसले आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेले ऋषिकेश मेथे-पाटील, ओंकार पाटील, यश देवणे, इंद्रजीत चौगुले, पवन माळी यांची तर खेलो इंडिया प्रशिक्षक अमर सासने, निखिल कदम, राष्ट्रीय पंच आजिंक्य गुजर यांचा यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.