नौदलाने संरक्षण मंत्रालयाला पाठविला अधिग्रहण प्रस्ताव
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय संरक्षण दलांच्या स्वदेशी अभियानाला वेग देत नौदलाने कोची शिपयाड लिमिटेडकडून निर्माण करण्यात येणाऱ्या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेसाठी केंद्र सरकारकडे महत्त्वाचा प्रस्ताव पाठविला आहे. संरक्षण मंत्रालयाला दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती आणि अधिग्रहणासाठी एक प्रस्ताव प्राप्त झाला आहे. याला स्वदेशी विमानवाहक-2 या नावाने ओळखले जाणार आहे. संरक्षण मंत्रालय लवकरच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. आयएसी-2 च्या निर्मितीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर कोची शिपयार्ड लिमिटेडच्या माध्यमातून हजारो रोजगार प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष स्वरुपात निर्माण होणार आहेत. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. कोची शिपयार्ड लिमिटेडकडून निर्मित या विमानवाहू युद्धनौकेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते. नौदलाला आयएनएस विक्रांतसाठी 26 राफेल लढाऊ विमाने प्राप्त होणार आहेत. तर स्वदेशी ट्विन इंजिन डेक एल-आधारित लढाऊ विमानाच्या खरेदीचाही विचार सुरू आहे.
3 युद्धनौकांची योजना
नौदल तीन विमानवाहू युद्धनौका इच्छित असून एकाचवेळी पश्चिम अन् पूर्व किनाऱ्यानजीक प्रत्येकी एक युद्धनौका तैनात करण्याचा विचार आहे. तर एक युद्धनौका पर्यायी स्वरुपात उपलब्ध ठेवण्याची योजना आहे. तीन विमानवाहू युद्धनौकांसोबत नौदल हिंद-प्रशांत क्षेत्रात तैनात सर्व नौदलांसोबत ताळमेळ कायम राखू शकणार आहे.