नागरी उ•ाण मंत्र्यांनी घेतली डॉ. कोरे यांच्या पत्राची दखल : विमान कंपन्यांशी चर्चा सुरू
बेळगाव ; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पत्राची दखल घेत बेळगाव विमानतळावरून सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे. बेळगाव विमानतळावरून सध्या आठवड्याला 84 विमानांची ये-जा असून, भविष्यात इतर शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा केली जात असल्याचे त्यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. उडाणअंतर्गत बेळगावमध्ये अनेक विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु अलायन्स एअरने तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे बेळगाव-पुणे विमानसेवा बंद केली. सध्या या मार्गावर नवीन सेवा सुरू करण्यास अद्याप कुठलीही विमान कंपनी तयार नाही. स्टार एअरने बेळगाव-नाशिक मार्गावरील सेवा काही कारणास्तव बंद केली होती. ती लवकरच सुरू करण्यासाठी कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. बेळगाव-म्हैसूर विमानफेरी विमान कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली. दिल्ली व चेन्नई या दोन विमानफेऱ्या 600 कि. मी. पेक्षा अधिक अंतराच्या असल्याने उडाणअंतर्गत त्या येत नाहीत. खासगी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू असून विमानसेवेचे विस्तारीकरण करण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.