बेळगाव-खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येकी तीन गावांची निवड; पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न, तलाव हिरवाईने नटणार
बेळगाव : मागील दोन ते तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तलावांची खोदाई व त्यांच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. उद्योग खात्रीतून याला नवे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता सरकारने पुन्हा हरित सरोवर करण्यासाठी पाऊल उचलले आहे. अमृत सरोवरानंतर आता हरित सरोवर करून ते नागरिकांच्या उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 10 सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नदी, नाले पूर्णपणे सुकून गेले आहेत. तर बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश तलाव पूर्णपणे सुकले आहेत. त्यामुळे यापुढे नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ऐन श्रावणातच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आता राज्य सरकारने हिरवे सरोवर निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बेळगाव तालुक्यात 3 सरोवरांची निवड केली असून त्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण 10 सरोवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्यात प्रत्येकी 3, बैलहोंगल 1, हुक्केरी 1, रामदुर्ग 1, सौंदत्ती 1, याप्रकारे तलावांची नावे राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे आता या तलावांचा कायापालट करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यात अमृत सरोवरांची संख्या लक्षात घेता हरित सरोवरांची संख्या अत्यंत कमी करण्यात आली आहे. मात्र या सरोवरांसाठी विशेष निधीची तरतूद केल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव जिल्ह्यात 300 हून अधिक तलाव आहेत. यामध्ये 29 हजार 548 हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. यापैकी बहुतांश तलाव पूर्णपणे सुकले आहेत. वाढत्या तापमानामुळे तलावांचे सुक्या जमिनीत ऊपांतर झाले आहे. गावांमध्ये असलेल्या तलावांवरच अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी अवलंबून असतात. त्याचबरोबर गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी या तलावांमधीलच वापरले जाते. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आता पुढील धोका रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टिकोनातून हरित तलावांची निर्मिती करण्यात येत आहे.
अंतर्जल पातळीत घट
तलाव भरले तर जमिनीतील अंतर्जल पातळी वाढते. परंतु जिल्ह्यातील 70 टक्के तलावांमध्ये पाणीच नसल्याने अंतर्जलाची पातळीदेखील घटली आहे. यावर्षी तलावांमध्ये पाणी नसल्याने तलावांची खोली वाढविण्याचा निर्णय लघुपाटबंधारे विभाग व इतर विभागांनी घेतला आहे. विशेषकरून जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतींमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या तलावांची निर्मिती करून जमिनीमध्ये पाणी झिरपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून हरित तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. यापूर्वी संजीवनी योजनेंतर्गत ज्या नद्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे, त्या नद्यांमधील पाणी तलावांमध्ये सोडून जमिनीत झिरपण्यास मदत होणार होती. मात्र ही योजना आता कुचकामी ठरली आहे. यासह अनेक योजना फोल ठरत असून याबाबत वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या हरित तलावांच्या निर्मितीसाठी उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे. या तलावांच्या शेजारी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
तलावांचे सौंदर्यीकरण करणार
हरित तलावांच्या माध्यमातून तलावांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध उपाय आखण्यात आले आहेत. सध्या बेळगाव जिल्ह्यातील 10 तलावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी तलावांच्या चारही बाजूंनी वृक्ष लागवड करून तलाव हिरवाईने नटणार आहेत.
– हर्षल भोयर, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी
बेळगाव जिल्ह्यातील निवड झालेल्या 10 गावांची नावे
तालुका तलाव मंजूर झालेल्या गावांची नावे
- बेळगाव संतिबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी
- बैलहोंगल पट्टिहाळ के. बी.
- हुक्केरी होसपेट
- खानापूर गर्लगुंजी, शिंदोळी, कापोली के. जी.
- रामदुर्ग तोरनगट्टी
- सौंदत्ती यरझरवी