वार्ताहर/ बेडकिहाळ
शमनेवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, मातंग गल्ली परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल कुलूपबंद असलेली आठ घरे फोडली. दरम्यान सदर घटनेमध्ये किरकोळ दागिने चोरीला गेले आहेत. तसेच घरातील होमथिएटर आणि मोबाईल संच लंपास केल्याची घटना शनिवारी 11 रोजी उघडकीस आली. या चोरीच्या घटनेमुळे शमनेवाडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शमनेवाडी येथील नवीन व जुन्या आंबडेकर परिसरातील शेकडो नागरिक, महिला यल्लमा यात्रेसाठी घरांना कुलूप लावून गेले होते. याच संधीचा लाभ घेत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री बंद घरांना लक्ष्य केले. यावेळी आठ घरात चोरी करण्यात आली.
येथील आक्काताई मनोहर माळगे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तिजोरी फोडून त्यातील लहान मुलांच्या 9 सोन्याच्या अंगठ्या, 6 जोड चांदीचे पैंजण, 4 नग वाळजोड, बिंदली व इतर किरकोळ 15 नग चांदीचे जिन्नस लंपास केले. त्यानंतर ऊपेश बाबासाब कांबळे यांच्या घरातील होमथिएटर आणि तसेच मोबाईल संच लांबविला. तसेच धनगर गल्लीतील देवकी भरमा गावडे यांचे कुलूपबंद घर फोडून देवीच्या अंगावरील अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.
याच परिसरात मालुबाई मल्लू कोरव, कुमार माळगे, फुलाबाई दावने, आनंद माने यांची देखील बंद असलेली घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण या सर्वांच्या घरात काही न मिळाल्याने चोरटे रिकाम्या हाताने परतले. दरम्यान घरमालक डोंगरावऊन शुक्रवारी परतल्यानंतर सदर चोरीच्या घटना उघडकीस आल्या. या घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.