होलसेल फूल बाजारात गर्दी : विविध आकर्षक फुले दाखल
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही तासांमध्ये येऊन ठेपल्याने फळ-फुलांची आवक वाढली आहे. विशेषत: गणरायाच्या स्वागतासाठी सोमवारी तब्बल 8 टन फुलांची आवक झाली होती. त्यामुळे अशोकनगर येथील फूलबाजार बहरला होता. श्रावण मासापासून फुलांची आवक वाढत आहे. विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होलसेल फूल बाजारामध्ये विविध प्रकारची फुले दाखल झाली होती.
फूल बाजारात झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, जुई, अबोली यासह विविध जातीची फुले मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. मंगळवारी गणेशचतुर्थी असल्याने फुलांना विशेष मागणी आहे. त्यामुळे होलसेल फूल बाजारात विविध ठिकाणांहून फुले दाखल झाली होती. फुलांबरोबर झेंडू आणि हारांचीही खरेदी झाली. फूल बाजारात पहाटे झालेल्या लिलावासाठी विक्रेते दाखल झाले होते.
17 ऑगस्टपासून निजश्रावण मासाला प्रारंभ झाल्यापासून फूल बाजारात दैनंदिन 7 ते 8 टन फुलांची आवक होत आहे. श्रावण महिन्यात पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मागणीही अधिक होती. आता गणरायाच्या स्वागतासाठी फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. त्यामुळे होलसेल फूल बाजारात आठ टनहून अधिक फुलांची आवक झाल्याचे दिसून आले.
फूल बाजारात आकर्षक झेंडू, गुलाब, मोगरा आणि इतर फुलांनी लक्ष वेधून घेतले होते. त्याबरोबरच विविध प्रकारचे लहान-मोठ्या आकारात हार विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दिवसभर किरकोळ बाजारात हार आणि फुलांची मोठी विक्री झाली. हरतालिका, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, सत्यनारायण पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी हार आणि फुलांची रेलचेल पाहावयास मिळाली.
दैनंदिन 7 ते 8 टन फुलांची आवक
होलसेल फूल मार्केटमध्ये श्रावणापासून दैनंदिन 7 ते 8 टन फुलांची आवक होत आहे. विशेषत: विविध जातींची फुले दाखल होऊ लागली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी फुलांची आवक वाढली होती. गुलाब, झेंडू, शेवंती व इतर फुलांना मागणी वाढली आहे.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)
हरतालिका व्रताचे श्रद्धेने आचरण
शहर परिसरात महिलांनी सोमवारी हरतालिका व्रत मोठ्या श्रद्धेने आचरणात आणले. हे व्रत प्रामुख्याने कुमारिका आणि विवाहित महिला करतात. इच्छित पती मिळावा यासाठी कुमारिका आणि अखंड सौभाग्य राहावे यासाठी विवाहिता हे व्रत करतात.
या व्रताच्या निमित्ताने बाजारात हरतालिकेच्या मूर्ती विक्रीस आल्या होत्या. महिलांनी या मूर्ती आणून त्यांची विधिवत प्रतिष्ठापना करून 16 प्रकारच्या पत्री अर्पण करून पूजा केली. हरतालिकेच्या बाजूलाच महादेवाची पिंडी स्थापन करून त्याचीही पूजा केली.
हरतालिकेच्या निमित्ताने महिलांनी उपवास केला आणि संध्याकाळी वाळकाचे खाप घालून ओटी भरली. मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी पार्वतीने आपल्या सखींसह रानात जाऊन हे व्रत आचरले होते. पार्वतीला जसा सहचर मिळाला तसाच आपल्यालाही मिळावा, ही या व्रतामागची धारणा आहे.