ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरात विधानसभा निवडणुकीचे (gujarat assembly election) बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने (election commission) पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. १ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या टप्प्याचे आणि ५ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तसेच, ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. (Gujarat Assembly Elections On Election Commission press conference)
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी १४ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर १५ नोव्हेंबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. याशिवाय १७ नोव्हेंबर हा दिवस अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे एक डिसेंबरला होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी पाच डिसेंबरला मतदान होणार आहे. तर आठ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
गुजरात विधानसभेत १८२ सदस्य असून, या विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातात.
तिरंगी लढत होणार
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये विजय मिळल्यानंतर गुजरातेतही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी भाजपविरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेतेही गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. याशिवाय भाजपनं या निवडणुकीत २५ टक्के उमेदवारांचं तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.