प्राथमिक स्तरावर पहिल्या 10 बस होणार सुरू
प्रतिनिधी/ सातारा
वर्ल्ड हेरिटेज म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱया कास पठारावर येणाऱया पर्यटक व वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. या प्रदुषणामुळे फुलांचे प्रमाण घटले असून हे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 10 इलेक्ट्रिकल बस प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवार दि. 6 रोजी कास पठारावर पाहणी दौरा केला. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपप्रादेशिक अधिकारी अनिल चव्हाण, त्यांच बरोबर पी.एम.पी.एल. पुणे व वनविभाग, सातारा, पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कास व पठारावर पर्यटकांसाठी इलेक्ट्रिकल बसचा वापर करून परिसरामध्ये होत असलेली गाडय़ांची वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यटन विकास मंडळामार्फत पी. एम. पी. एल. मार्फत दहा बसेस सुरू करण्याची योजना आखल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. कास रस्त्यावर असलेल्या गणेशखिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाडय़ा पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱया इलेक्ट्रिकल बसची पर्यटकांना मोफत बस सेवा देण्यात येणार आहे.