किटला येथे प्रकल्प उभारण्याची केली मागणी
प्रतिनिधी / पणजी
डिफेन्स एक्स्पोमुळे प्रसिद्ध झालेल्या किटला येथील पठारावर आयआयटी प्रकल्प स्थापन करावा. हा पठार सुमारे 8 लाख चौरस मीटर एवढा विस्तीर्ण आहे, असा प्रस्ताव केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी गुरुवारी सरकारला दिला. आधी काणकोण, नंतर सत्तरी आणि त्यानंतर सांगेतून आयआयटीचा प्रस्ताव गुंडाळण्यात आल्यानंतर आता किटला येथील जमीनीवर या प्रकल्पासाठी प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
डिकॉस्टा यांच्या सदर प्रस्तावावर बोलताना उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी आयआयटी प्रकल्पासाठी आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार यांनी प्रस्ताव दिले होते. परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरल्याचे सांगितले. त्यानंतरही मंत्री सुभाष शिरोडकर आणि सुदिन ढवळीकर यांनी आपापल्या मतदारसंघात सदर प्रकल्प आणावा अशी मागणी केली होती. परंतु नंतर लगेचच विरोध करणारे पुढे येतात, आंदोलने होतात, त्यातून मग आंदोलकांच्या विरोधापुढे स्थानिक आमदारालाही नमते घ्यावे लागते व प्रस्ताव गुंडाळला जातो. या एकुण परिस्थितीत केंद्रापुढे गोवा तोंडघशी पडत आहे. त्यामुळे अशी मागणी करताना एखाद्या लोकप्रतिनिधीने आधी स्वतःच्या मतदारांचे मत जाणून घ्यावे व त्यांचा होकार असेल तरच सरकारला प्रस्ताव सादर करावा, असे गुदिन्हो यांनी सांगितले.
त्यावर बोलताना डिकॉस्टा यांनी किटला येथील सदर जागेस विरोध होण्याचे कारणच नाही. त्या जागेत कोणतीही झाडे, बागायती नाहीत. जवळपास लोकवस्तीही नसल्यामुळे विरोधासाठी कुणीच पुढे येणार नसल्याचे ते म्हणाले. याउलट सरकार अशी उपयुक्त जागा एवढी वर्षे विनावापर ठेवत आहे त्यामागे अन्य कोणता हेतू आहे का असा संशय आपले मतदार उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याही पुढे जाताना त्यांनी सदर प्रकल्पास कुणी विरोध करत असेल तर आपण त्यात लक्ष घालून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.