होन्निहाळ-माविनकट्टीजवळील घटना : वैमानिक किरकोळ जखमी : एअरक्राफ्टचे काही प्रमाणात नुकसान
बेळगाव : प्रशिक्षण विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मंगळवारी सकाळी होन्निहाळ-माविनकट्टी येथे झालेल्या या घटनेमध्ये पायलट किरकोळ जखमी झाला. शेतामध्ये लँडिंग करण्यात आलेले विमान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बेळगाव विमानतळावर काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेल्या रेडबर्ड या खासगी वैमानिक प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण दिले जात आहे. मंगळवारी व्हीटी-आरबीएफ हे एअरक्राफ्ट घेऊन 20 वर्षीय चंबा खिनलेस हा वैमानिक प्रशिक्षण घेत होता. सकाळी 9.30 च्या सुमारास विमानामध्ये अचानक बिघाड झाल्याने नियंत्रणाबाहेर गेले. यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत होन्निहाळ-माविनकट्टी या गावानजीकच्या शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग केले. यामध्ये एअरक्राफ्टचे काही प्रमाणात नुकसान झाले. वैमानिकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. विमानातून पेट्रोल लिकेज होत असल्याने तात्काळ अग्निशमन जवानांना पाचारण करण्यात आले. शेतामध्ये उतरलेले विमान पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशमनचे अधिकारी शशिकांत निलगार, ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर यांसह विमान प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.