पार्किंगसह इतर सुविधा होणार उपलब्ध : किरकोळ कामे शिल्लक
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या कामाला चालना मिळाली आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामाला जोर आला आहे. मागील पाच वर्षांपासून बसस्थानक नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कोरोनामुळे कामगारांचा अभाव आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष, यामुळे बसस्थानकाचे काम लांबणीवर पडले. मात्र आता कामाला जोर आला आहे.
तब्बल 31 कोटी निधीतून दोन सुसज्ज बसस्थानके उभारली जात आहेत. यापैकी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ फलाट आणि इतर किरकोळ कामे शिल्लक राहिली आहेत. मात्र सीबीटी बसस्थानकाचे काम अद्याप निम्मे शिल्लक आहे. या बसस्थानकात पूर्वी शहरांतर्गत आणि ग्रामीण भागाच्या बससेवा सुरू होत्या. त्यामुळे या ठिकाणी शहरांतर्गत बसेस थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना सुसज्ज अशी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकाचवेळी हजारो वाहने पार्क होतील, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा पार्किंगचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागणार आहे.
दोन्ही बसस्थानके एकमेकांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही बसस्थानकात ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील सुटणार आहे. या बसस्थानकात बसपास विभाग व इतर कार्यालयीन खोल्या उभारल्या जात आहेत. या बहुमजली बसस्थानकात पहिल्या मजल्यावर कार्यालयीन व्यवस्था व तळमजल्यात पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
बसस्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत
बसस्थानकाचे काम जलदगतीने सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत बसस्थानक पूर्ण करून उद्घाटन केले जाणार आहे. मध्यंतरी कोरोना आणि इतर कारणांमुळे काम थांबले होते. मात्र आता कामाला वेग आला असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
– पी. वाय. नायक (विभागीय नियंत्रण अधिकारी)