टिपूसुलतान संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मणिपूर व हरियाणा येथे हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. मणिपूर येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढली आहे. ही घटना अत्यंत लज्जास्पद असून केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेतील आरोपेंवर कठोर कारवाई करून महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा अमलात आणावा. अल्पसंख्याकांचे संरक्षण करावे, अशा मागणीचे निवेदन टिपूसुलतान संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मणिपूर येथे हिंसाचाराची घटना अद्यापही सुरूच आहे. या घटनेत महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. यामुळे संपूर्ण देशाला मान खाली घालावी लागली आहे. केंद्र व तेथील राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे. महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. याबरोबरच अल्पसंख्याकांचे जीवनही धोक्यात आले आहे. केंद्र सरकारकडून अल्पसंख्याकांना म्हणावे तसे संरक्षण देण्यात येत नसल्याने या घटना वाढत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंसाचार करत असलेल्या मणिपूर व हरियाणा येथील अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्यात यावे. हरियाणात सुरू असलेला प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी टिपूसुलतान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.