वृत्तसंस्था /ओव्हल
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या शेवटच्या सामन्यात यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात चहापानापर्यंत 7 बाद 250 धावा जमवल्या होत्या. इंग्लंडतर्फे ब्रुकने शानदार अर्धशतक झळकवले. या मालिकेत दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला आहे. पहिले सलग दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून आपले आव्हान जिवंत ठेवले होते. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडला बरोबरी करण्याची संधी लाभली होती पण पावसाने ती हिरावून घेतल्याने ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत अॅशेस स्वत:कडे राखले आहे.
या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या ओव्हलच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली पण इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच धावांची गती राखली होती. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 12 षटकात 62 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने इंग्लंडची ही जोडी फोडताना डकेटला झेलबाद केले. त्याने 41 चेंडूत 3 चौकारांसह 41 धावा जमवल्या. त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा गडी पाठोपाठ गमवला. कमिन्सने सलामीच्या क्रॉलेला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमवल्या. हॅझलवुडने रुटचा 5 धावावर त्रिफळा उडवला. इंग्लंडची यावेळी स्थिती 3 बाद 73 अशी होती. मोईन अली आणि ब्रुक यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. उपाहारावेळी इंग्लंडने 26 षटकात 3 बाद 131 धावा जमवल्या होत्या. ब्रुक 48 तर मोईन अली 10 धावावर खेळत होते.
उपाहारानंतर ब्रुकने आपले अर्धशतक 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 44 चेंडूत झळकवले. तसेच त्याने मोईन अलीसमवेत चौथ्या गड्यासाठी 111 धावांची शतकी भागीदारी केली. मर्फीच्या फिरकीवर मोईनचा त्रिफळा उडाला. त्याने 47 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमवल्या. कर्णधार स्टोक्स फार काळ खेळपट्टीवर राहू शकला नाही स्टार्कच्या इनस्विंगरवर स्टोक्सचा 3 धावांवर त्रिफळा उडाला. त्यानंतर हॅझलवूडने बेअरस्टोला 4 धावावर त्रिफळाचित करून इंग्लंडवर अधिकच दडपण आणले. चहापानापूर्वी स्टार्कने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ब्रुकला स्लिपमध्ये स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 91 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 85 धावा जमवल्या. इंग्लंडचे द्विशतक 246 चेंडूत तर 250 धावा 302 चेंडूत फलकावर लागल्या. चहापानावेळी इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 250 धावा जमवल्या होत्या. वोक्स 2 चौकारांसह 15 तर वूड 4 चौकारांसह 23 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क आणि हॅझलवूड यांनी प्रत्येकी 2 तर कमिन्स, मार्श आणि मर्फी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 50 षटकात 7 बाद 250 (क्रॉले 22, डकेट 41, मोईन अली 34, रुट 5, 91 चेंडूत ब्रुक 85, स्टोक्स 3, बेअरस्टो 4, वोक्स खेळत आहे 15, वूड खेळत आहे 23, अवांतर 18, स्टार्क 2-58, हॅझलवूड 2-54, कमिन्स 1-66, मार्श 1-43, मर्फी 1-13). (धावफलक चहापानापर्यंत)