ओली रॉबिन्सन ‘सामनावीर’, इंग्लंडची कसोटी मालिकेत आघाडी
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील येथे सोमवारी झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडने पाकचा 74 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी मिळविली. पाकच्या दुसऱया डावात 50 धावात 4 बळी मिळविणाऱया रॉबिन्सनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. इंग्लंडच्या अँडरसनने आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावताना 36 धावात 4 गडी बाद केले. पाकच्या शकीलचे अर्धशतक मात्र वाया गेले.
या पहिल्या कसोटीत फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांकडून पाच दिवसांच्या कालावधीत जवळपास 1600 धावांचा पाऊस पाडला गेला. इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावा जमविल्यानंतर पाकने पहिल्या डावात 579 धावांपर्यंत मजल मारल्याने इंग्लंडने 78 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव 7 बाद 264 धावांवर घोषित करून पाकला निर्णायक विजयासाठी 343 धावांचे आव्हान दिले.
या कसोटीतील सोमवारच्या शेवटच्या दिवशी पाकला विजयासाठी आणखी 263 धावांची जरुरी होती आणि त्यांचे 8 गडी खेळायचे होते. रॉबिन्सन आणि अँडरसन यांच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसमोर पाकची फलंदाजी कोलमडली. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने पाकला खेळाच्या चार सत्रांमध्ये 343 धावांचे आव्हान देताना डाव घोषित करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. पाकच्या दुसऱया डावामध्ये इमाम उल हकने 77 चेंडूत 8 चौकारांसह 48 तर अझहर अलीने 81 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. त्यानंतर शकीलने चिवट फलंदाजी करत 159 चेंडूत 12 चौकारांसह 76 धावा जमविल्या. तो पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. चहापानापर्यंत पाक संघाला ही कसोटी अनिर्णित राखण्याची संधी निर्माण झाली होती. इंग्लंडने उपलब्ध असूनही दुसरा नवा चेंडू तासभर उशिराच घेतला. कारण जुन्या चेंडूवर अँडरसन आणि रॉबिन्सन यांची स्विंग गोलंदाजी अधिकच परिणामकारक ठरत होती.
कर्णधार स्टोक्सने क्षेत्ररक्षणाचा व्यूह अचूक रचल्याने पाकच्या फलंदाजांना फटके मारणे खूपच अवघड गेले. चुकीचे फटके मारण्याच्या नादात ते ठरावीक अंतराने बाद झाले. चहापानावेळी पाकची स्थिती 5 बाद 257 अशी होती. पण खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकने आपले शेवटचे 5 गडी केवळ 11 धावात गमविले. इंग्लंडच्या जॅक लिचने पाकचा शेवटचा फलंदाज नसिम शहाला पायचीत करून पाकचा डाव 96.3 षटकात 268 धावांवर संपुष्टात आणला. पाककडून कसोटी पदार्पण करणाऱया शकीलला रॉबिन्सनने बदली खेळाडू जेनिंग्जकरवी झेलबाद केले. जेनिंग्जने हा झेल डावीकडे झेपावत एकहाती घेतला. इंग्लंडतर्फे रॉबिन्सन आणि अँडरसन यांनी प्रत्येकी 4 तर स्टोक्स आणि लिच यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंड संघाने पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली असून आता उभय संघातील उर्वरित दोन कसोटी सामने मुल्तान आणि कराची येथे होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक इंग्लंड प. डाव 657, पाक प. डाव 579, इंग्लंड दु. डाव 7 बाद 264 (डाव घोषित), पाक दु. डाव 96.3 षटकात सर्व बाद 268 (शकील 76, मोहम्मद रिझवान 46, इमाम उल हक 48, सलमान 30, बाबर आझम 4, शफीक 6, नसिम शहा 6, रॉबिन्सन 4-50, अँडरसन 4-36, स्टोक्स 1-69, लिच 1-56).