तिसऱ्याच दिवशी यजमान इंग्लिश संघाची एकमेव कसोटीत बाजी : द्विशतकवीर ओली पोप सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडने आयर्लंडवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात द्विशतकी खेळी साकारणाऱ्या इंग्लंडच्या ओली पोपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, आयर्लंडविरुद्ध विजयानंतर यजमान इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 सप्टेंबरपासून अॅशेस मालिका खेळवली जाईल.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आयर्लंडचा पहिला डाव 56.2 षटकांत 172 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 524 धावा करून डाव घोषित केला. इंग्लंडकडून ओली पोपने सर्वाधिक 205 तर बेन डकेटने 182 धावा फटकावल्या. तर झॅक क्रोलीने 56 व ज्यो रुटने 56 धावांचे योगदान दिले. इंग्लंडला 352 धावांची आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात खेळताना आयर्लंडच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी साकारली. सुरुवातीला सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. हॅरी टेक्टरने अर्धशतकी खेळी साकारताना 51 धावा फटकावल्या तर लोरकन टकरने 44 धावांचे योगदान दिले. यानंतर आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अँडी मॅकब्राईन आणि मार्क एडेर यांनी आयर्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी केली. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी ही भागीदारी झाली. दोघांनी मिळून 165 चेंडूत 163 धावा केल्या. आयर्लंड क्रिकेटसाठी कसोटीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. यादरम्यान अँडी मॅकब्राईनने 14 चौकारांच्या मदतीने 86 धावांची नाबाद खेळी केली, तर मार्क एडेअरने 77 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 88 धावा केल्या. याआधी आयर्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम अँड्य्रू बलबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांच्या नावावर नोंदवला गेला होता. 24 एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 115 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, मॅकब्राईन व एडेअर ही जोडी बाद झाल्यानंतर आयर्लंडचा दुसरा डाव 86.2 षटकांत 362 धावांवर संपुष्टात आला व इंग्लंडला विजयासाठी 11 धावांचे आव्हान मिळाले. विजयासाठीचे हे किरकोळ आव्हान इंग्लंडने 4 चेंडूत पूर्ण करत विजय मिळवला. झॅक क्रोलीने सलग तीन चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड प.डाव 172 व दुसरा डाव 86.2 षटकांत सर्वबाद 362. इंग्लंड प.डाव 4 बाद 524 घोषित व दु.डाव 0.4 षटकांत बिनबाद 12.
बेन स्टोक्सने रचला इतिहास!
146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘असा‘ पराक्रम करणारा पहिलाच कॅप्टन
लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व आयर्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडला 10 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासोबतच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने कसोटीत नवीन इतिहास रचला आहे. स्टोक्सने एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे, जो 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कुणालाही शक्य झाला नव्हता. स्टोक्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा एकमेव कर्णधार बनला आहे, ज्याने फलंदाजी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण न करता सामना जिंकला आहे. स्टोक्सपूर्वी कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी जमली नव्हती, ज्याने फलंदाजी केली नसेल, गोलंदाजीही केली नसेल आणि क्षेत्ररक्षणही केले नसेल. मात्र, त्याने या सामन्यादरम्यान एक झेल पकडला होता