इंग्लंडची अॅलेसी कॅप्से तर दक्षिण आफ्रिकेची चोले ट्रायॉन सामनावीर
पर्ल (दक्षिण आफ्रिका)
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे खेळवण्यात आलेल्या गट दोनमधील सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा चार गड्यांनी पराभव करत आपला दुसरा विजय नोंदवला. तर गट 1 मधील सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडताना न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडची फलंदाज अॅलेसी कॅप्सेने दमदार अर्धशतक झळकवल्याने तिची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेच्या चोले ट्रायॉनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
गट 2 मधील इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामना चुरशीचा झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा डाव 18.2 षटकात 105 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 14.2 षटकात 6 बाद 107 धावा जमवत या स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयर्लंडच्या डावामध्ये गॅबी लेविसने 37 चेंडूत 5 चौकारासह 36, प्रेंडरगेस्टने 15 चेंडूत 2 चौकारासह 17, अॅमी हंटरने 14 चेंडूत 2 चौकारासह 15 तर कर्णधार लॉरा डिलेनीने 16 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा केल्या. लुसी लिटलने 1 षटकारासह 8 तर वेलड्रॉनने 1 चौकारासह 5 धावा जमवल्या. इंग्लंडतर्फे सोफी इक्लेस्टोन, सारा ग्लेन आणि क्लेरी डिन यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. इक्लेस्टोनने 13 धावात 3, डिनने 26 धावात 2 तर ग्लेनने 19 धावात 3 गडी बाद केले. बेल आणि कॅथरेनी स्किव्हेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आयर्लंडच्या डावात 1 षटकार आणि 11 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचे शेवटचे आठ गडी केवळ 25 धावांत बाद झाले.
इंग्लंडच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्याच षटकातील 5 व्या चेंडूवर आयर्लंडच्या प्रेंडरगेस्टने सलामीच्या डंक्लेला झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 4 धावा जमवल्या. डॅनी वेट आणि अॅलिसी कॅप्से यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. केलीने कॅप्सेला झेलबाद केले. तिने 22 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 51 धावा झळकवल्या. कॅप्सेने आपले अर्धशतक केवळ 21 चेंडूत नोंदवले. महिलांच्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत कॅप्सेचे जलद अर्धशतक आहे. कॅप्से सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. केलीने तिला झेलबाद केले. डॅनी वेट चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचित झाली. तिने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमवल्या. नॅट स्किव्हेर चौथ्या गड्याच्या रुपात तंबूत परतील. मरेने तिला झेलबाद केले. स्किव्हेरने 7 चेंडूत 5 धावा जमवल्या. कर्णधार हिथेर नाईट अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकली नाही. मरेने तिचा त्रिफळा उडवला. नाईटने 23 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमवल्या. मरेने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना अॅमी जोन्सला झेलबाद केले. तिने 12 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमवल्या. इंग्लंडची यावेळी स्थिती 14 षटकात 6 बाद 103 अशी होती. स्किव्हेर आणि इक्लेस्टोन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. स्किव्हेरने 1 चौकारासह नाबाद 5 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. आयर्लंडतर्फे केरा मरेने 15 धावात 3 तर प्रेंडरगेस्ट, केली यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. गट 2 मध्ये आता इंग्लंडने दोन सामन्यातून 4 गुणासह पहिले स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा आता या गटातील पुढील सामना भारताबरोबर 18 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. तर आयर्लंडचा पुढील सामना बुधवार 15 फेब्रुवारीला पाकिस्तानबरोबर होईल.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड 18.2 षटकात सर्वबाद 105 (लेविस 36, प्रेंडरगेस्ट 17, हंटर 15, डिलेनी 12, इक्लेस्टोन 3-13, ग्लेन 3-19, डीन 2-26, बेल 1-17, स्किव्हेर 1-14), इंग्लंड 14.2 षटकात 6 बाद 107 (अॅलिसी कॅप्से 51, डंक्ले 4, वेट 16, नॅट स्किव्हेर 5, हिथेर नाईट 14, अॅमी जोन्स 12, कॅथरेनी स्किव्हेर नाबाद 5, केरा मरे 3-15, प्रेंडरगेस्ट 1-13, केली 1-19).
दक्षिण आफ्रिका विजयी
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या गट 1 मधील सामन्यात ट्रायॉनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत विजयाचे खाते उघडताना न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रायॉनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तिने फलंदाजीत 40 धावांचे तर गोलंदाजीत 2 गडी बाद करून महत्त्वाची कामगिरी केली. या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात लंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.
सोमवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 132 धावा जमवल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 18.1 षटकात 67 धावात आटोपला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये चोले ट्रायॉनला 34 चेंडूत 6 चौकारासह 40, निडेनी डी क्लर्कने 26 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 28, कर्णधार सुने लुसने 17 चेंडूत 4 चौकारासह 19, सलामीच्या वुलव्हर्टने 17 चेंडूत 1 चौकारासह 13, टकेटने 5, तसेच सिनालो जेफ्टाने 1 चौकारासह नाबाद 5 धावा जमवल्या. न्यूझीलंडतर्फे इडेन कार्सन आणि ली तेहुहु यांनी प्रत्येकी 2 तर जेनसेनने एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 15 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे कार्सनने 23 धावात 2, तेहुहुने 27 धावात 2, जेनसेनने 13 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 18.1 षटकात 67 धावात आटोपला. त्यांच्या तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार डिव्हाईनने 26 चेंडूत 1 चौकारासह 16 तर अमेलिया केरने 12 चेंडूत 2 चौकारासह 10 तसेच जेस केरने 13 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या डावात केवळ 5 चौकार नोंदवले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबाने 10 धावात 3, कॅपने 13 धावात 2, ट्रायॉनने 12 धावात 2, शबनीम इस्माईलने 7 धावात 1 तर खाकाने 9 धावात 1 गडी बाद केला. या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिका संघाने गट 1 मधून दोन पैकी एक सामना जिंकला असून त्यांचा या गटातील पुढील सामना 18 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकाबरोबर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकात 6 बाद 132 (छोले ट्रायॉन 40, डी क्लर्क नाबाद 28, सुने लुस 22, वुलव्हर्ट 13, कार्सन 2-23, तेहुहु 2-27, जेनसेन 1-13) न्यूझीलंड 18.1 षटकात सर्वबाद 67 (सोफी डिव्हाईन 16, जेस केर 11, अॅमेलिया केर 10, मलाबा 3-10, शबनीम इस्माईल 1-7, कॅप 2-13, खाका 1-9, ट्रायॉन 2-12).
आजचे सामने
विंडीज वि. भारत (केपटाऊन) वेळ-सायंकाळी 6.30 वाजता
पाक वि. आयर्लंड (केपटाऊन)