तिसऱया व शेवटच्या लढतीत भारतीय महिला संघावर 7 गडी राखून मात
ब्रिस्टॉल / वृत्तसंस्था
कमी धावसंख्येचे संरक्षण करताना भारतीय महिला संघाने काटेकोर मारा केला असला तरी नवोदित ऍलाईस कॅप्सेने नाबाद 38 धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी साकारली आणि याच बळावर इंग्लंडने तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 7 गडय़ांनी विजय मिळवला. याचवेळी 2-1 फरकाने त्यांच्या मालिकाविजयावर देखील शिक्कामोर्तब झाले. भारतीय महिला संघाने 20 षटकात 8 बाद 122 धावा केल्या तर प्रत्युत्तरात इंग्लिश महिला संघाने 18.2 षटकात 3 बाद 126 धावांसह विजय संपादन केला.
प्रारंभी, भारताला 8 बाद 122 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने 22 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या तर अष्टपैलू पूजा वस्त्रकारने 11 चेंडूत नाबाद 19 धावांचे योगदान दिले. सोफी इक्लेस्टोन (3-25), साराह ग्लेन (2-11) व ब्रायोनी स्मिथ (1-19) या फिरकी त्रिकुटाने एकत्रित 6 बळी घेत भारतीय संघाला सातत्याने धक्के दिले. याशिवाय, प्रेया डेव्हिस व इसी वाँग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात इंग्लंडने 18.2 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले. सोफिया डंकलीने 44 चेंडूत सर्वाधिक 49 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय, 18 वर्षीय कॅप्सेने नाबाद 38 धावा फटकावत या विजयात मोलाचा वाटा उचलला. सलामीवीर डंकली व डॅनी वॅट (23 चेंडूत 22) यांनी 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर भारतीय संघाने 4 षटकात 3 बळी घेत इंग्लंडला लागोपाठ धक्के दिले होते.
फिरकी अष्टपैलू स्नेह राणाने (1-32) वॅटला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. 6 चौकार फटकावणाऱया डंकलीचा अडसर वस्त्रकारने दूर केला. कर्णधार ऍमी जोन्सला (3) राधा यादवने (1-14) स्वस्तात बाद केले. पण, इंग्लंडच्या सर्वात प्रभावी युवा खेळाडूंपैकी एक असलेल्या कॅप्सेने संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधत चौफेर फटकेबाजी केली. तिला नाबाद 13 धावा जमवणाऱया स्मिथची उत्तम साथ लाभली.
भारतीय फलंदाजी लाईनअपची पडझड
प्रारंभी, रिचा घोष व पूजा वस्त्रकार यांनी डाव शतकापार नेण्यापूर्वी संघाची 7 बाद 75 अशी पडझड झाली होती. शफाली वर्मा (12 चेंडूत 5) व स्मृती मानधना (8 चेंडूत 9) हे दोन्ही सलामीवीर पहिल्या 4 षटकांमध्येच बाद झाले. मेघना व दयालन हेमलता यांना तर खातेही उघडता आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर 5 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्माने 24 धावांच्या खेळीसह रिचाच्या बरोबरीने डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, नंतर इक्लेस्टोनला स्वीप करण्याच्या प्रयत्नात तिचा अंदाज चुकला व जोन्सने यष्टीचीत केले. घोष व वस्त्रकार यांनी शेवटच्या 3 षटकात 43 धावांची फटकेबाजी केल्याने भारताला 100 धावांचा टप्पा सर करता आला.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला ः 20 षटकात 8 बाद 122 (रिचा घोष नाबाद 33, दीप्ती शर्मा 24, पूजा वस्त्रकार 11 चेंडूत नाबाद 19 सोफी इक्लेस्टोन 25 धावात 3 बळी).
इंग्लिश महिला ः 18.2 षटकात 3 बाद 126 (सोफिया डंकली 49, ऍलाईस कॅप्से नाबाद 38, राधा यादव 1-14).
कोट्स
आम्हाला 20 धावा कमी पडल्या आणि हाच फरक निर्णायक ठरला. कमी धावसंख्येचे संरक्षण करत असतानाही आमच्या गोलंदाजांनी उत्तम मारा केला. आम्हाला फलंदाजीच्या आघाडीवर मोठी भागीदारी साकारण्यावर अधिक भर देत रहावे लागेल.
-भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर