350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजन
वास्को ; रवींद्रभवन वास्कोतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुरगांव तालुक्यातील 10 ते 15 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या इतिहासावर आधारीत पोर्ट्रेट पेंटिंग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रवींद्रभवन बायणा वास्को येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, तानाजी, मावळे इत्यादी ऐतिहासीक व्यक्तीमत्वांचे पोर्ट्रेट पेंटींग किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत पेंटींग हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत एकूण 68 शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पोट्रेट पेंटिंग स्पर्धेत श्रीया म्हालदार हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस श्रीया सावंत तर तिसरे बक्षीस सत्यम धामस्कर याला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे हरेश गोसावी, ध्रुवी खाजनेकर, सान्वी मडगांवकर, आचल गिरी व गंगाराम शेंडेकर यांना देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण चित्रकार सुनील शिवा नाईक यांनी केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रवींद्रभवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रमुख वक्ते भगतरामजी छाबडा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.