दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. याचदरम्यान प्रभास आता ‘राजा डीलक्स’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभासची नायिका म्हणून अभिनेत्री निधी अग्रवाल झळकणार आहे. याची पुष्टी दिग्दर्शक मारुति यांनी दिली आहे. दक्षिणेत स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केलेल्या निधीला आता प्रभाससोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘राजा डीलक्स’ या चित्रपटात ती मुख्य नायिका असणार आहे. या चित्रपटात प्रभास दुहेरी भुमिकेत असणार आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी धाटणीचा असून यात प्रभास आजोबा अन् त्याचा नातू या दोन्ही भूमिका साकारणार आहे. तर निधी अग्रवाल यात प्रभासची नायिका म्हणून दिसणार आहे. निधीने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. निधी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. निधीने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही तिला बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करता आलेले नाही. याचमुळे तिने आता दक्षिणेवर लक्ष केंद्रीत केले आहे.