खाण, वन खात्याची मंजुरीपत्रे सादर करा : पर्यावरण मूल्यमापन समितीचे कंपनीला निर्देश
पणजी : डिचोलीतील खनिज खाण पुन्हा सुरू करण्यासाठी वेदांता लिमिटेडला पर्यावरणीय मंजुरी देण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यमापन समितीने (ईएसी) आपला निर्णय पुढे ढकलला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत, कोळसा खाण नसलेल्या प्रकल्पांच्या पर्यावरणीय मूल्यमापनासाठीच्या ईएसीने गोव्यातील खाण लीज क्षेत्रात कोणतेही बेकायदेशीर खाणकाम करण्यात आले आहे किंवा नाही, आणि करण्यात आलेले असल्यास ते वेदांता कंपनीने केले आहे किंवा नाही, यासंबंधी गोवा खाण संचालनालयाकडून एक पत्र सादर करण्याचे निर्देश प्रकल्प प्रस्तावकांना दिले आहेत. सुमारे 478.5206 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या डिचोली मिनरल ब्लॉक 1 मध्ये डिचोलीसह बोर्डे, लामगाव, मुळगाव, मये आणि शिरगाव या गावांचा समावेश आहे. त्याची प्रस्तावित वार्षिक उत्पादन क्षमता 3 दशलक्ष टन इतकी आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात हा खाण ब्लॉक वेदांताने मिळविला आहे.
लीज प्रस्तावात परस्परविरोधी माहिती
राज्यातील 2018 पासून बंद पडलेल्या खाणी नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू होतील अशी घोषणा नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली होती. मात्र खाण लीज क्षेत्रातील वनजमिनींच्या सहभागाबाबत प्रकल्प प्रस्तावकाने परस्परविरोधी माहिती दिली होती, त्यामुळे कोणतीही स्पष्टता नाही, असे निरीक्षण ईएससीच्या दि. 21 व 22 सप्टेंबर रोजी झालेल्या 20 व्या ईएसी बैठकीच्या इतिवृत्तात नोंदविले आहे. खाण लीज क्षेत्र आणि मयेतील वनजमीन यांच्या सीमा सामायिक असल्यामुळे खाण लीज क्षेत्रात वनजमिनी समाविष्ट करण्याबाबत प्रकल्प प्रस्तावकांनी राज्य वन खात्याकडून पत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही या इतिवृत्तात नोंदविण्यात आले आहे. राज्यात 2018 पासून खाणी बंद आहेत. त्यामुळे त्यांचा लिलाव करण्यात आला असला तरीही सध्याची परिस्थिती तपासण्याची गरज आहे. त्यामुळे झटपट मंजुरी देता येणार नाही, असे निरीक्षण ईएसीने नोंदविले आहे.
खाण गर्द वनक्षेत्र, लोकवस्तीत
सदर खाण ही गर्द वनक्षेत्र असलेल्या भागात आहे. त्याशिवाय जवळच्या भागात लोकवस्ती, शाळा, मंदिरे, नदी, गुहा आणि किल्लेही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्प प्रस्तावकांनी वाहतुकीचा भार योग्यरित्या काढलेला नाही. तसेच या खाणीच्या पर्यावरण मंजुरीसाठी दि. 11 ऑगस्ट रोजी डिचोलीत झालेल्या जनसुनावणीत प्रकल्पाच्या विरोधात 4,708 लेखी आक्षेप सादर करण्यात आले होते, तर प्रकल्पाच्या समर्थनार्थ 5,183 पत्रे प्राप्त झाली होती, असेही ईएसीने आपल्या निरीक्षणे आणि शिफारशींमध्ये म्हटले आहे.
मागवलेले स्पष्टीकरण म्हणजे प्रक्रियेचा भाग : वेदांता
ईएसीने मागवलेले स्पष्टीकरण हे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्रक्रियेचा भाग होते, असे मत गोवा वेदांताच्या प्रवक्त्याने व्यक्त केले आहे. आम्ही नियमांचे पालन करण्यास आणि जबाबदार तसेच पारदर्शक पद्धतीने खाणकाम सुरू करण्यास वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.