हिंदुस्थान, भारतवर्ष, जंबुद्वीप… अशा नानाविध नावांनी परिचित असलेला अखंड देश फाळणीनंतर भारत आणि इंडिया नावांनी ओळखला गेला. महाभारतकालीन शकुंतला-दुष्यंत पुत्र भरत महाप्रतापी आणि सार्मभौम सम्राट होता. त्याच्यावरूनही हा खंडप्राय देश भारत म्हणून नावारुपास आला. ऋग्वेद काळात शौर्यवंत अशी भरत नावाची जमात होती, त्यांचे जनपद भरत असे होते. प्राचीन ग्रीक भूगोल लेखकांनी सन पूर्व चौथ्या व पाचव्या शतकात या भूमीचा उल्लेख इंडोस असा केला आणि त्यातूनच इंडिया व इंडिका अशी नावे प्रचलित झाली. आर्य, अनार्य, द्रविड, चिनी, शक, हूण, पठाण, मोगल… अशा नानाविध लोकसमूहाने भारत देश समृद्ध केला. द्वीपकल्पीय, उत्तरेची विस्तीर्ण पर्वतमाला आणि या दोहोंच्या मधले विशाल मैदान, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा अशा नद्या यांच्या सान्निध्यात ही भूमी अश्मयुगापासून आदिमानवांसाठी आकर्षणबिंदु ठरली अणि त्यामुळेच नाना लोक समुदाय, भाषा, वांशिक गटांनी या प्रदेशाला विविधतेत एकात्मता प्रदान केलेली आहे. विस्तृत क्षेत्र आणि नैसर्गिक विभिन्नता यांच्यामुळे भारताच्या भिन्न भिन्न भागांतले हवामान व पर्जन्यमान वेगळे आहे पण मौसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या हवामानाच्या भिन्नतेतही समानता निर्माण झालेली आहे. हिमालयाच्या पर्वतश्रुंखला आशियातून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांना अडवून भारताला सुरक्षित ठेवते. ज्वालामुखीच्या स्फोटांमुळे सह्यापर्वत जन्मला तर पृथ्वीला सुरकुती पडून पश्चिम सागर निर्माण झाला. राजस्थानात समुद्र आटल्यावर वाळवंटाची निर्मिती झाली. हिमालयाच्या पर्वतरांगात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना आदी नद्यांनी मैदानी प्रदेशाला सुजलाम्, सुफलामतेचा वारसा प्रदान केला. त्यामुळे अश्मयुगापासून वावरणाऱ्या नर्मदा खोऱ्यातले विविध आदिमानवाचे समूह गट परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या आधारे आपले जगणे समृद्ध करण्यात सफल ठरले होते. परिसरातल्या जंगली श्वापदांची शिकार करून मांस त्याचप्रमाणे उपलब्ध कंदमुळे, फळे-फुले यांचे भक्षण करणारा आदिमानव शेती आणि आगीच्या नवाश्मयुगात लागलेल्या शोधामुळे एका जागी स्थायिक होऊ लागल्याने कालांतराने लोकसंस्कृती आणि लोकधर्म विकसित झाला. चेन्नईपासून काही अंतरावरच्या पल्लावरम् येथे अश्मयुगीन दगडी हत्यार आढळलेले आहे. उत्तर प्रदेशातल्या बेलन नदी खोऱ्यात, महाराष्ट्रात प्रवरेच्या काठी, नेवाश्याला दगडी हत्यारे आढळली, त्याद्वारे पर्यावरणीय परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन अश्मयुगीन मानव काश्मिरसारख्या थंड हवेच्या बर्फाळ प्रदेशात आणि दक्षिणेतल्या उष्ण आणि दमट हवामानात कसे राहात होता, याची प्रचिती येते. नर्मदेच्या खोऱ्यातील गुहेत आणि शिलाश्रयातही त्याचे वास्तव्य होते. बेलन नदी खोऱ्यात जंगली बैल, म्हैस, काळवीट, हरिण, सांबर, गेंडा, जंगली हत्ती, जंगली घोडा, जंगली गाढव या प्राण्यांचे जीवाश्म आढळलेले आहे. महाराष्ट्रातल्या जळगावात पाटणे त्याचप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात शहामृगाची अंडी सापडली आहेत. मध्य प्रदेशातील अनेक शिलाश्रयांत, गुहांत बरीच मध्याश्मयुगीन रंगीत चित्रे विविध रंगांचे गेरू आणि नैसर्गिक रंगांचा उपयोग करून काढलेली पाहायला मिळतात. त्यावरून तत्कालीन मानव धनुष्य-बाणांनी जंगली श्वापदांची शिकार करताना, मारलेले जनावर वस्तीवर नेताना पाहायला मिळते. मासेमारी, उंदीर पकडणे, फळे तोडणे, मध गोळा करणे, त्यांच्या धार्मिक समजुती आदींचे चित्रण या चित्रांद्वारे होत आहे. भारत-पाकिस्तानातल्या सिंधु संस्कृतीच्या शोधामुळे पाच हजार वर्षांपूर्वीच्या प्रगत आणि अतिप्राचीन वारश्याची कल्पना मिळते. आजच्या पाकिस्तानातल्या मेहेरगढ येथील उत्खननातून इथे शेती सुरू होऊन स्थिर जीवन सुरू झाल्याचे समजते. गहू, बार्लीची लागवड, गाई-मेंढ्यांचे पालन करण्याबरोबर शिकार आणि मासेमारी तसेच चाकावर मातीची भांडी नक्षीदार करीत असत. कच्च्या विटांची घरे बांधत तसेच मातृदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जात असे. सिंधु-सरस्वतीच्या खोऱ्यातील जमीन सुपीक असल्याने तेथे गहू, बार्ली, रागी, ज्वारी, बाजरी, तीळ, वाटाणे, खजूर, केळी, कापूस आदी पिके घेतली जायची. सिंधु संस्कृतीत उपलब्ध पुराव्यानुसार इथे मातृदेवतेची पूजा होत असावी. वाघासारख्या जंगली प्राण्यांच्या सान्निध्यातली पशुपतीची मूर्ती आढळलेली आहे. ब्राँझ धातूच्या बैलाची मूर्ती आढळलेली आहे. प्रवरा नदीकाठी अहमदनगर जवळच्या दायमाबाद येथे हत्ती, गेंडा, रेडा यांच्या ब्राँझच्या चाके बसविलेल्या मूर्ती आढळलेल्या आहेत. पुरुष आरुढ झालेला बैलाचा रथही आढळला आहे. सिंधु संस्कृतीच्या संचिताद्वारे इथल्या समाजाला आपल्या परिसरात आढळणाऱ्या पशु, वृक्ष संपदा यांच्याविषयीच्या आदर भावनेची प्रचिती येते. सिंधु संस्कृतीतल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांतून त्याकाळच्या मानवी समाजात निसर्ग आणि पर्यावरणाविषयीच्या संवेदनेची जाणीव होते. नगरनियोजन कसे होते, त्याची प्रचिती नियोजनबद्ध रस्ते, गटारे, सांडपाणी यांचा निचरा करण्यासाठी जी व्यवस्था केली होती, त्याद्वारे येते. येथील मुद्रांवर पिंपळ, शमीसारख्या वृक्षांची कोरलेली चित्रे आढळली आहेत. सिंधु संस्कृती पर्यावरणीय परिवर्तनामुळे लयाला गेल्यावर वैदिक आर्याची संस्कृती प्रस्थापित झाल्याची पाहायला मिळते. त्याकाळी पाऊस पडावा म्हणून इंद्रपूजा केली जायची. इंद्राकडून ज्या वृत्तासूरचा अंत झाला त्याची तुलना काळ्या मेघाशी करून, इंद्र आपल्या वज्राने त्याचे पोट फाडून, त्यात अडकलेले पाणी मुक्त करतो, हे समजते. अथर्व वेदातल्या भूमीसुक्तात मानवी समाज आणि निसर्गातल्या अनुबंधांचे दर्शन घडते. भूमी ही मातृदेवता तर पर्जन्य हा पिता मानलेला असून, भूमीमाता मानवाची पोषणकर्ती असल्याचे मानलेले आहे. चंबळ, नर्मदा, तापी नदी खोऱ्यात आढळलेल्या संस्कृतीच्या अवशेषांतून पर्यावरणीय मूल्यांचे दर्शन घडते. एका मोठ्या रांजणावर स्त्री आणि घोरपडीची प्रतिमा तर काही ठिकाणी मगर आणि कासवाची चित्रे पाहायला मिळतात. इसवी सनाच्या 326 मध्ये भारतावर जेव्हा अलेक्झांडरने स्वारी केली, त्यावेळी पर्जन्यमान चांगले होते. पंजाबात विपुल वनसंपदा होती. पूर नियंत्रण आणि जल नियोजनासाठी चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीत गुजरातातल्या जुनागढजवळ नदी संगम स्थळी धरणाची उभारणी केल्याचे संदर्भ आढळतात. बौद्धाच्या जातक कथांत शाक्य व कोळीय या दोन जमातीत रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून निर्माण झालेला वाद भगवान बुद्धाने मध्यस्थी करून मिटविल्याचे उल्लेख मिळतात. मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत पर्यावरणाचा फार मोठा वाटा असून, पर्यावरण जर अनुकूल असेल तर सांस्कृतिक विकास झपाट्याने होतो आणि प्रतिकूल असेल तर ऱ्हास होतो, असे प्रतिपादन पुरातत्त्वतज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी केलेले आहे. त्याची प्रचिती इथल्या अश्मयुगीन ते आधुनिक कालखंडातल्या इतिहासाच्या टप्प्यावरती अनुभवायला मिळते. प्राचीन भारतात चंद्रगुप्त मौर्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याकडे लक्ष केंद्रित केले होते तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीनेही विशेष योगदान दिले होते.
– राजेंद्र पां. केरकर