ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
होळीपूर्वी केंद्र सरकारने नोकरदारांना मोठा झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीवर मिळत असलेल्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केला आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) दोन दिवसीय बैठक शुक्रवारी गुवाहाटी येथे सुरू झाली आहे. या बैठकीत 2022 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएफवरील व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. आता सीबीटीच्या निर्णयानंतर 2021-22 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर अर्थ मंत्रालयाकडे सहमतीसाठी पाठवण्यात येणार आहे. अर्थमंत्रालयामार्फत सरकारने याची खातरजमा केल्यानंतरच ईपीएफओ व्याजदर देते.
चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78 नंतर ईपीएफवरील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78 मध्ये हा व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता.