जागतिक रेबिज दिनी मुख्यमंत्र्यांचा आशावाद : ‘स्टॅटिक पॉइंट’ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन
पणजी : गोवा रेबिजमुक्त करण्याचा सरकारचा मानस असला तरी ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे, तरच रेबिजचे समूळ उच्चाटन करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. जागतिक रेबिज दिनानिमित्त काल शुक्रवारी मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या रेबिजमुक्त गोवा स्टॅटिक पॉईंट लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, पशुसंवर्धन खाते, गोवा विज्ञान केंद्र, तारांगण मिरामार आणि रोटरी क्लब ऑफ मिरामार यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर त्यावेळी मिशन रेबिज इंडियाचे संचालक मुऊगन अप्पुपिल्लई, प्रकल्प संचालक ज्युली कार्फमॅट, पशुसंवर्धन संचालक डॉ. आगोस्तिन्हो मिस्किता, उपसंचालक डॉ. प्रकाश कोरगावकर, महापौर रोहित मोन्सेरात, पशुसंवर्धन सचिव सरप्रितसिंग गिल, मनपा आयुक्त क्लेन मदेरा, रोटरी क्लबच्या अध्यक्ष सोनाली नागवेंकर, विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक, विलास चौधरी, उपमहापौर डॉ. नोएल फर्नांडिस, मानद सचिव संजीव नाईक, श्वेता सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
पाळीव कुत्र्यांचे घरोघरी जाऊन करणार लसीकरण
स्टॅटिक पॉईंट लसीकरण मोहिमेंतर्गत मिशन रेबिजचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करणार असून लोकांनी त्यांना सहकार्य करावे. त्यामुळे गोव्यातून रेबीजचा नायनाट होण्यास मदत होईल. प्रत्येकाने आपल्या पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करावे. परराज्यातून आणण्यात आलेल्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात तर कोणतीही हयगय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
पाळीव कुत्र्यांची नोंदणी करावी
पशुसंवर्धन खाते आणि मिशन रेबीज यांच्या निरंतर प्रयत्नांमुळेच देशातील पहिले रेबिजमुक्त राज्य बनण्याचा मान गोव्याला मिळाला हे सत्य असले तरीही आमचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्यात कुत्र्यांची संख्या अमर्याद वाढली असून ती नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला पावले उचलावी लागतील. तसेच कुत्र्यांनी चावे घेण्याच्या घटनांतही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या कुत्र्यांची नोंदणी करून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले. अप्पुपिल्लई यांनी मिशन रेबिजचे महत्त्व सांगितले. श्रीमती कार्फमॅट यांनी लसीकरण मोहिमेबद्दल माहिती देताना रेबिज हा विषाणूजन्य आजार असून गंभीर आणि तेवढाच प्राणघातक रोग असल्याचे सांगितले. तमन्ना वरळीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शहनाज शरीफ यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रेबिजमुक्त गोवा स्टॅटिक पॉईंट लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी काढलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.