पुणे / प्रतिनिधी :
लष्कर-ए-तोयबा या बंदी घालण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीस 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मोहम्मद जुनैद मोहम्मद अता (वय 28, रा.गोंधनापूर, ता. खामगाव, बुलढाणा) याला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपुष्टात आल्यानंतर त्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसकडून न्यायालयात सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी मंगळवारी केली. एटीएसने या गुन्हय़ाचा तपास सुरू आहे. दाखल गुन्हय़ाच्या अनुषंगाने साक्षीदार लोकांकडे तपास करून त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे, दाखल गुन्हय़ातील अटक आरोपीचा सोशल मीडिया अकाऊंटचा डेटा मोठय़ा प्रमाणात असून त्याच्या विश्लेषणाचे काम सुरू आहे. सदर गुन्हय़ात हव्या असलेल्या आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात दिली.
याप्रकरणात आरोपी मोहंम्मद जुनैद याच्याकडील तपासाच्या चौकशीत पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील पलमार किश्तवाड येथून सुतारकाम करणारा व लष्कर-ए-तोयबाचा हस्तक आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय 28) यालाही दोन जून रोजी अटक केली असून, त्याची पोलीस कोठडी 14 जूनपर्यंत आहे.