ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मागील आठवडय़ात भारतीय कुस्ती संघटनेने बरखास्त केली होती. शरद पवारांसाठी हा एक धक्का मानला जात होता. त्यानंतर आता ही परिषद चावविण्यासाठी भारतीय कुस्ती संघाकडून एक अंतरिम समिती स्थापन करण्यात आली आहे. या अंतरिम समितीचे संचालक संजय कुमार सिंह, संयोजक एस पी देशवाल आणि आदित्य प्रताप सिंह हे सदस्य असतील. या तीन जणांची समिती आता महाराष्ट्र कुस्ती परिषद चालवणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन कुस्तीगीर परिषदेनं केलं नव्हतं. तसेच 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही परिषदेने नकार दर्शवला होता. त्यामुळे राज्यातील मल्ल आणि कुस्ती संघटनांकडून राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे आणि कुस्ती परिषदेकडून अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे 30 जून रोजी भारतीय कुस्ती महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही परिषद बरखास्त करण्यात आली.
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. तरी देखील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. त्यानंतर आता परिषद चालवण्यासाठी दुसरी समिती स्थापन करण्यात आल्याने पवारांसाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे.