जुनेच गणवेश घालून जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ : सरकारचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा सुरू होऊन पाच महिने झाले तरी अद्याप सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्यात आलेले नाहीत. यामुळे जुनेच गणवेश घालून विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील काही शाळांना एकच गणवेश देण्यात आला असल्याने आठवडाभर तोच वापरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग सुरू होते. विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश व बूट यांचे वितरण थांबविण्यात आले होते. यावषी 16 मे पासून नियमित पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू होऊन पाच महिने होत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश व बूट उपलब्ध झालेले नाहीत. राज्य सरकारने घोषणा करून देखील जिल्हय़ातील केवळ मोजक्मयाच शाळांना गणवेश पोहोचले आहेत.
सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्यात येतात. यावषीही हे साहित्य देण्यासाठी सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचलेले नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष होत आले तरी शाळांना गणवेश व बूट देण्यात आले नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरवषी विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्यात येत असले तरी यावषी मात्र केवळ एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे.
सायकल वितरण कागदावरच
हायस्कूलमधील विद्यार्थिनींना शाळेपर्यंत पोहोचता यावे यासाठी शिक्षण विभागाकडून सायकलचे वितरण करण्यात येते. यावषी सायकल वितरण करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. परंतु अद्याप तरी बेळगाव शिक्षण विभागाकडे असा कोणताही आदेश आला नसल्यामुळे सायकल वितरणाचा निर्णय कागदावरच राहिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.