गुटख्यावर पोलीस व अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई
गौरी आवळे/ सातारा
महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटखा(पान मसाला, सुगंधी तंबाखु व आरएमडी)ची वाहतूक करणाऱया इसमास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून 24 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चालु वर्षातील गुटख्यावरची ही तिसरी कारवाई पोलिसांनी केली. अशाच कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून ही करण्यात येतात. फक्त कारवाई का पुढे काय असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. याच दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने लॉकडाऊन काळात त्याच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला 48 लाख 83 हजार 234.5 एवढय़ा किंमतीचा गुटखा नष्ट केला. पोलीसांनी जप्त गुटखा नष्ट केल्याची माहिती दिली आहे.
गुटखा उत्पादन, विक्री, वितरण, वाहतूक, साठवणूक करण्यास महाराष्ट्र राज्यात पूर्ण बंदी आहे. तरीही छुप्या पद्धतीने गुटख्याची आवक राज्यात होत आहे. या गुटख्यावर थेट कारवाईचा बडगा अन्न व औषध प्रशासन व पोलिसांकडून उगारला जातो. हा जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याचे मोठे आवाहन पोलीस व अन्न व औषध प्रशासनापुढे नेहमी उभे असते.
पोलिसांनी गुटख्यावर कारवाई केली की, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी जावून पंचनामा करतात. हा जप्त केलेला मुद्देमाल गोडाऊन मध्ये आणून ठेवला जातो. ज्यावेळी गोडाऊन मध्ये जागा नसेल तेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात ठेवला जातो. यांची संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर मा. न्यायालयाकडे अर्ज केला जातो. त्याच्या आदेशाने तो नष्ट करण्यात येतो.
गुटखा असा होतो नष्ट
मा. न्यायालयाने गुटखा नष्ट करण्याचे आदेश दिले की, पोलीस व अन्न व औषध प्रशासन हे सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र देतात. आरोग्य विभाग त्यांना जागा उपलब्ध करून देतो. त्या जागेत मोठा खड्डा खोदला जातो. या खड्डयात जप्त केलेला गुटखा टाकला जातो. आणि खड्डा मुजवून गुटखा नष्ट केला जातो.
लॉकडाऊन मध्ये 48 लाखाचा गुटखा नष्ट
कोरोनामुळे सन 2020-21 या दोन वर्षात लॉकडाऊन लागू होते. या लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी गुटख्यावर कारवाई केली. परंतु तो जप्त मुद्देमाल गोडाऊन मध्ये साठवून ठेवण्यात आला. पुन्हा अनलॉक होताच मा. न्यायालयाची परवानगी घेऊन जप्त केलेला 48 लाख 83 हजार 234.5 रूपये किंमतीचा गुटखा सोनगाव कचरा डेपो येथे नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त अपर्णा भोईटे यांनी दिली.
गुटख्याची परराज्यातून आवक
महाराष्ट्र राज्यात गुटख्यावर बंदी असली तरी यांची आवक ही परराज्यातून होते. परराज्यात गुटखा उत्पादन होते. यांचा फायदा घेवून छुप्या पद्धतीने हा गुटखा विक्रीसाठी राज्यात आणला जातो. जशी माहिती मिळेल तशी अन्न व औषध प्रशासन कारवाई करत असून सन 2020 पासून 65 ते 70 कारवाई करण्यात आलेल्या आहेत.
प्रतिक्रिया–
मोठय़ा साठेखोरांवर आमचे लक्ष
गुटखा बंदी असताना छुप्या पद्धतीने यांची विक्री करण्यात येत आहे. यात मोठे साठेखोर यांचा हात आहे. यांची आवक थांबवण्यासाठी या मोठय़ा साठेखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. यांच्यावर कारवाई झाली की, छोटय़ा टपऱयावर गुटखा पोहचणार नाही. तसेच नागरिकांनी गुटखा विक्री होताना आढळून आले की, यांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन करत आहे.
किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा
1) स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या गुटख्याच्या कारवाई
वर्ष कारवाई गुटख्याचा मुद्देमाल जप्त
2020 2 3 लाख 24 हजार 580
2021 3 20 लाख 82 हजार 800
2022 3 29 लाख 8 हजार 620
2) अंमली पदार्थावर केलेल्या कारवाई
वर्ष कारवाई अंमली पदार्थाचा जप्त केलेला मुद्देमाल
2020 3 7 लाख 81हजार 750
2021 2 9 लाख 84 हजार 680