गोकाक पोलिसांची कारवाई : आतापर्यंत 20 जण ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक वीज प्रसरण निगम नियमितमध्ये रिक्त असलेल्या ज्युनिअर असिस्टंट पदासाठीच्या परीक्षेतील घोटाळाप्रकरणी गोकाक पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघा आरोपींना अटक केली आहे. केपीटीसीएल परीक्षा घोटाळाप्रकरणी संशयितांची धरपकड सुरूच आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक पोलिसांनी ही कारवाई केली.
अक्षय दुंडाप्पा भंडारी (वय 33, रा. अरभावी), बसवराज रुद्राप्पा दुंडनट्टी (वय 34, रा. बिरगंडी), श्रीधर लकाप्पा कट्टीकर (वय 22, रा. राजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक झाली असून अजूनही काही जणांची धरपकड करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत बेळगाव शहरातील 19, बैलहोंगल येथील 4, खानापूर येथील 3, रामदुर्ग येथील 4, सौंदत्ती येथील 4, चिकोडी येथील 8, गोकाक येथील 5, अथणी येथील 4, रायबाग येथील 4 अशा एकूण 55 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने घेऊन ही धरपकड सुरू केली आहे.