शक्तिशाली देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करावा
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. मोठ्या आणि शक्तिशाली देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करू नये. अन्यथा हे जग अत्यंत धोकादायक ठिकाण ठरणार असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे. निज्जरच्या हत्याप्रकरणी होत असलेल्या तपासात भारताकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
18 जून रोजी निज्जरची अज्ञातांनी हत्या केली होती. तर 18 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत बोलताना ट्रुडो यांनी दहशतवादी निज्जरची हत्या भारताच्या हस्तकांनी केल्याचा आरोप केला होता. ट्रुडो यांनी केलेले आरोप भारताने फेटाळले आहेत.
निज्जरच्या हत्येप्रकरणी आमची भूमिका प्रारंभापासून स्पष्ट आहे. आम्हाला ठोस पुरावे मिळाल्यावरच आम्ही याविषयी वक्तव्य केले आहे. एका कॅनेडियन नागरिकाची त्याच्याच देशात हत्या करण्यात आल्याने ही भूमिका घेण्यात आली. तपासात मदत करण्याचे आवाहन आम्ही भारताला केले होते असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.
अमेरिकेसह आमच्या सहकारी देशांसोबत आम्ही यासंबंधी चर्चा केली आहे. कॅनडात नेहमीच कायद्याचे राज्य राहिले आहे. जर बलवानाला योग्य मानले जाऊ लागले तर मोठे आणि शक्तिशाली देश आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करू लागतील आणि यातून हे जग अधिक धोकादायक स्थितीत पोहोचणार आहे. आम्ही भारताच्या संपर्कात आहोत असे ट्रुडो म्हणाले.
अमेरिकेसोबत मिळून तपास
कॅनडाने भारतावर आरोप करण्यापूर्वी गुप्तचर पुरावे जमविण्यासाठी अमेरिकेसोबत मिळून काम केले होते. निज्जरच्या हत्येतील कथित स्वरुपातील भारताच्या हस्तकांच्या भूमिकेसंबंधी कॅनडाने अमेरिकेच्या सहकार्याने तपास केला होता. कॅनडाने फाईव्ह आइज संघटनेतील देशांना (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड) याप्रकरणी संयुक्त वक्तव्य करण्याचे आवाहन केले होते, परंतु या देशांनी भारतासोबतचे संबंध पाहता काहीही बोलण्यास नकार दिला होता.