बँक खाती उघडण्यासाठी दिव्यांग, अंध, निरक्षर महिला, वृद्धांची फसवणूक : 5 ते 10 हजाराच्या आमिषाने कागदपत्रांचा गैरवापर
बेळगाव : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांचे कार्यक्षेत्र विस्तारत चालले आहे. नऊ राज्यातील सुमारे 32 खेड्यांत मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारांचे वास्तव्य व वावर आहे. हे गुन्हेगार देशभरातील तपास यंत्रणेला डोकेदुखीचे ठरले आहेत. सावजाला फसवून ऑनलाईनच्या माध्यमातून हे गुन्हेगार सावजाचे बँक खाते रिकामे करण्यात माहीर आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीची प्रकरणे वाढतीच आहेत. तपास यंत्रणेसमोर मात्र एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगत बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत ओटीपी मिळवून दुसऱ्या खात्यात रक्कम वळविली जाते. सायबर गुन्हेगार हे सावजाच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतात. ती बँक खाती खरोखरच या गुन्हेगारांच्या नावे असतात का? खाती उघडण्यासाठी त्यांनी दिलेली माहिती, पत्ते, कागदपत्रे खरी असतात का? याचा तपास हाती घेणाऱ्या सायबर क्राईम विभागाला धक्का बसेल, अशी माहिती उजेडात आली आहे. नागरी पोलीस ठाण्यांपेक्षा सायबर क्राईम विभागाकडे तक्रारी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढती आहे. यावरून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे, हेच दिसून येते. सावजाला गाठून गुन्हेगार त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतात. गुन्ह्यानंतर लगेच यासंदर्भात माहिती मिळाली तर गुन्हेगारांचे बँक खाते गोठवून ती रक्कम परत मिळविता येते. जिल्हा व शहर सायबर क्राईम विभागाने गुन्हेगारांची खाती गोठवून कोट्यावधी रुपये फ्रिज केले आहेत.
या प्रकरणांच्या तपासासाठी ज्यांच्या नावे बँक खाती आहेत, त्यांचे दरवाजे ठोठावण्याचे काम सायबर क्राईम विभागाने हाती घेतले. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा सीईएनचे एक पथक नोयडा, ग्रेटर दिल्लीला गेले होते. बँक खाती उघडण्यासाठी गुन्हेगारांनी ज्यांचा पत्ता व ज्यांच्या नावाची आधारकार्ड दिली आहेत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्यानंतर धक्कादायक सत्य तपास अधिकाऱ्यांना पाहायला मिळाले. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे म्हणतात, ज्यांच्या नावे खाती उघडली आहेत, ज्यांच्या नावे सीमकार्ड खरेदी केले आहे, ती सगळीच बोगस असतात. ज्यांच्या नावे बँक खाते आहे, गुन्हेगार फसवणूक प्रकरणातील रक्कम वळविण्यासाठी ज्या खात्यांचा वापर करतात, त्या खातेधारकांना आपल्या नावे नेमके काय चालले आहे? याची पुसटशीही कल्पना नसते. दिव्यांग, वृद्ध, महिला आदींना 5 ते 10 हजार रु. देऊन त्यांच्या नावे बँक खाती उघडली जातात. त्यासाठी त्यांच्या कागदपत्रांचा वापर केला जातो. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ज्यावेळी खातेधारकांच्या घरी पोहोचतात, त्यावेळी हा सारा प्रकार उघडकीस येतो. बेळगाव पोलिसांनाही अशा बँक खातेधारकांचा दरवाजा ठोठावला असता दिव्यांग, वृद्ध, निरक्षर महिला आढळून आल्या. केवळ ती खाती गोठवून त्यांना परत फिरावे लागले. ज्यांच्या नावे बँक खाती आहेत, यापैकी अनेकांना आपल्या कागदपत्रांचा वापर कशासाठी होतोय? याची कल्पना नाही.
सावजाला ठकविण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर खाती उघडली जातात. एखाद्या प्रकरणानंतर गुन्हेगार सीमकार्ड बदलतात, त्यामुळे सहजपणे ते सायबर क्राईम विभागाच्या रडारमध्ये येत नाहीत. त्यामुळेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण जात असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांची बँक खाती गोठवून पैसे परत मिळविण्याचे कर्तव्य पोलीस पार पाडत आहेत. अशा गुन्हेगारांच्या वास्तव्यासाठी झारखंडमधील जामतारा व दियोघर परिसर कुप्रसिद्ध आहे. जामतारामधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी तर देशभरातील पोलीस यंत्रणा त्यांच्यामागे लागलेल्या आहेत. तरीही ते पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. दिल्लीमधील अशोकनगर, उत्तमनगर, शकपूर, हरकेशनगर, ओखला, आझादपूर परिसरात सायबर गुन्हेगारांचा मोठा वावर वाढला आहे. आता बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेशमधील काही गावांमध्येही सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. नऊ राज्यांतील 32 गावांतील सायबर गुन्हेगार डोकेदुखी ठरू लागले आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच चीन, तुर्की, पाकिस्तानमधून आलेले सायबर गुन्हेगारही गुन्हेगारीत उतरले आहेत. देशभरातील नागरिकांना फसवणुकीसाठी जी शहरे व गावातून सायबर गुन्हेगार फोन करतात, ती 32 गावे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारांना पोसत आहेत. एखाद्या घटनेनंतर तपासासाठी गुन्हेगारांनी सीमकार्ड खरेदीसाठी, बँक खाती उघडण्यासाठी दिलेले पत्ते दिव्यांग, वृद्ध, अंध आदींच्या नावे असतात. पोलिसांना तो पत्ता सापडतो, ज्यांच्या नावे बँकेत खाते आहे, ती व्यक्तीही सापडते. खरे गुन्हेगार मात्र सायबर क्राईम विभागाच्या हाताला लागत नाहीत.
सायबर क्राईम विभागाकडून व्यापक जागृती…
वाढते गुन्हे लक्षात घेऊन सायबर क्राईम विभागाकडून व्यापक जागृती केली जात आहे. आता शाळा-कॉलेजमध्ये जाऊन पोलीस सामाजिक संघटना व संस्थांच्या मदतीने जागृती करीत आहेत. एकीकडे सायबर गुन्हेगारी थोपविण्यासाठी जागृती सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगारही मोठ्या प्रमाणात हात-पाय पसरत आहेत. ‘सबका नंबर आएगा’ या ध्येयाने पछाडलेले सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस शिरजोर बनत चालल्याने समाजानेच शहाणे होणे काळाची गरज आहे.