वार्ताहर/ कोयनानगर
कोयना परिसरातील चिरंबे गावाजवळ शेतातील विहिरीच्या खोदकामासाठी विनापरवाना जिलेटीन या स्फोटकाच्या सहाय्याने स्फोट केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध कोयना पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा नोंदविला आहे. यापैकी संतोष अशोक पवार (वय 36, रा. निसरे) यास अटक करण्यात आली आहे, तर इंद्रनाथ योगी (वय 40, रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) हा पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या स्फोटाच्या घटनेने कोयना परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिरंबे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने या घटनेतील संशयित आरोपींवर वन विभाग काय करवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील कोयना विभागातील चिरंबे गावाजवळ बुधवार 4 मे रोजी रात्री जिलेटीन या स्फोटकाच्या सहाय्याने केलेल्या स्फोटामुळे संपूर्ण चिरंबे परिसर हादरला. स्फोटाच्या बातमीने कोयना परिसरात एकच खळबळ उडाली. शेतातील विहिरीच्या खोदकामासाठी हा स्फोट करण्यात आल्याने या स्फोटाचे गांभीर्य परिसरातील जनतेच्या लक्षात आले नाही. मात्र कोयना पोलीस ठाण्याचे हवालदार मानसिंग संपतराव संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या स्फोटाच्या घटनेची तक्रार कोयना पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.
या घटनेची कोयना पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, कोयना परिसरातील चिरंबे गावाजवळ अभय थोरात यांच्या मालकीच्या शेतात विहिरीच्या खोदकामासाठी जिलेटीन या स्फोटकाचा वापर करून स्फोट केल्याची घटना बुधवार 4 मे रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एकूण 25 जिलेटीन कांडय़ांचा वापर करून स्फोट केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी असलेल्या ट्रक्टरमध्ये उर्वरित 115 जिलेटीनच्या कांडय़ा निदर्शनास आल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रचंड स्फोटामुळे चिरंबे गावातील काही घरांवर दगड उडाले, तर काही घरांना भेगा पडल्याचे प्रथम दर्शनी पहावयास मिळाले. या स्फोटाच्या घटनेची फिर्याद कोयना पोलीस ठाण्याचे हवालदार मानसिंग संपतराव संकपाळ यांनी दिली. त्यानुसार घटनास्थळी जिलेटीनच्या कांडय़ासह उभा असणारा ट्रक्टर ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ट्रक्टर मालक संतोष अशोक पवार (वय 36, रा. निसरे) यास अटक करण्यात आली, तर घटना घडताच इंद्रनाथ योगी पळून गेला. त्याचा शोध कोयना पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बोबडे करत असून हवालदार घोलप व चव्हाण त्यांना सहकार्य करत आहेत.
स्फोटांना जबाबदार कोण?
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱया गावांवर वन्यप्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अनेक निर्बंध लावले जातात. यामध्ये दिवाळीत मोठय़ा आवाजात फटाके फोडू नयेत, मोठय़ा आवाजात लाऊडस्पीकर लावू नये असे निर्बंध आहेत. मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असे स्फोट केले जातात याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.