पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक 17 (फॉर्म 17) भरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (उद्या) ते 24 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज आणि शुल्क भरायचे असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क स्वीकारले जाणार नाही. अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत (मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत), प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड आणि छायाचित्र जोडणे, मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्याच्या पत्त्यानुसार आणि माध्यमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपर्ककेंद्राची, बारावीच्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी. संबंधित केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा आणि आनुषंगिक मूल्यमापनासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यावर 1 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत मूळ अर्ज, ऑनलाइन शुल्क भरल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती, अर्जातील संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्यात. तर संपर्क केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी 30 ऑगस्टला विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्काच्या पोचपावतीची एक प्रत, मूळ कागदपत्रे आणि विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे, असे नमूद करण्यात आले आहे. अधिक माहिती दहावीच्या विद्यार्थ्यांना http//:form17.mh-ssc.ac.in या दुव्यावर, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http//:form17.mh-hsc.ac.in या दुव्यावर देण्यात आली आहे.
हेही वाचा : सुषमा अंधारे शिवसेनेत; उद्धव ठाकरेंनी सोपवली उपनेतेपदाची जबाबदारी