ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात एका तोतया आयएएस अधिकाऱ्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी असल्याचे सांगत पुण्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो वावरत होता. मात्र, औधमधील एका कार्यक्रमात त्याचे पितळ उघडे पडले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱयांचे नाव असून, तो तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंधमध्ये पुणे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या वतीने जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी पाठविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी विरेन शहा, सुहास कदम, पी. के. गुप्ता व इतर सदस्य हजर होते. कार्यक्रमाला आलेल्या वासुदेवने संस्थेच्या सदस्यांना आपले नाव डॉ. विनय देव असे सांगत आपण आयएएस पदावर असल्याचे सांगितले. सध्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत असून, आपण गोपनीय कामेही करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी वासुदेव यांच्याकडे अधिक विचारणा केली असता ते गडबडले. त्यावेळी त्यांच्या आयएएस पदाबाबत सदस्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांच्या चौकशीत वासुदेवचे पितळ उघडे पडले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला अटक करुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.