फायनान्स कंपनीकडील लोनसाठी पिता – पुत्रांची शक्कल ः करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी, कोल्हापूर
Kolhapur News : फायनान्स कंपनीच्या कर्जासाठी ग्रामपंचायतीचे खोटे लेटर पॅड तयार करुन त्यावर सरपंच व ग्रामसेवकाच्या खोटय़ा सह्या व शिक्यांचा वापर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आनंदा बाबु मिरजकर, प्रदीप आनंदा मिरजकर (दोघेही रा. केर्ली, ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद विजयमाला बाबासो चौगुले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयीत आनंदा मिरजकर व प्रविण मिरजकर यांनी कर्ज मिळविण्यासाठी जनविकास फायनान्स कंपनीकडे अर्ज केला होता. यासाठी त्यांनी केर्ली गावातील 708 ही मिळकत दिली होती. यासाठी या मिळकतीचा सिटी सर्व्हे झालेला नाही. तसेच तारण गहाणखत करण्यास ग्रामपंचायतीची हरकत नाही असा दाखला आवश्यक होता. यासाठी संशयीत या दोघांनी ग्रामपंचायतीचे बनावट लेटर पॅड तयार केले तसेच ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करुन त्यांच्या बोगस सह्यांच्या आधारे हा दाखला तयार करुन या दोघांनी कंपनीमध्ये दिला.